भारताचा विंडीजविरुद्धचा दुसरा ‘टी20’ सामना आज
पहिल्या लढतीतील पराभवानंतर ‘आयपीएल स्टार्स’समोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान
हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादवकडून सुधारित फलंदाजीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ प्रोव्हिडन्स (गयाना)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरी ‘टी20’ आंतरराष्ट्रीय लढत आज रविवारी होणार असून यावेळी भारतातील सर्वांत जास्त मागणी असलेल्या ‘आयपीएल स्टार्स’समोर पिछाडी भरून काढण्याचे आणि आपली प्रतिष्ठा सांभाळून ठेवण्याचे आव्हान असेल. ताऊबा येथील सुऊवातीच्या सामन्यात दोन संघांमध्ये चार धावांनी फरक घडवून आणला. वेस्ट इंडिजने प्रभावी गोलंदाजी करण्याबरोबर संथ खेळपट्टीवर टिकाव धरत त्या लढतीत विजय मिळवला.
यंदाच्या एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा होणार असलेल्या वर्षात ‘टी20’ मालिकेला प्रचंड महत्त्व नसले, तरी कर्णधार हार्दिक पंड्या आणि त्याचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून अधिक सुधारित फलंदाजीची अपेक्षा आहे. इशान किशन, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यासह या दोघांचेही डोळे विश्वचषकाकडे लागलेले आहेत. परंतु त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडली, तर आशिया चषकापूर्वी त्यांचा आत्मविश्वास बळावेल. नवोदित तिलक वर्मा हा त्याच्या 39 धावांच्या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे.
तीन देशांत (त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना व अमेरिका) नऊ दिवसांच्या कालावधीत पाच ‘टी20’ सामने होणार असताना कर्णधार हार्दिक, सलामीवीर गिल आणि किशन, फिरकीपटू कुलदीप यादव यांना पुढील स्पर्धा लक्षात घेऊन पुरेशी विश्रांती मिळणे देखील आवश्यक आहे. एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात वय वाढलेल्या खेळाडूंचा समावेश असून त्या संघासारखा हा संघ नसला, तरी थोडी विश्रांती आणि भरपूर प्रवास अशा परिस्थितीत बरेच ‘टी20’ सामने खेळणे हे त्यांच्यासाठी फारसे फायदेशीर ठरणार नाही.
वेस्ट इंडिजविऊद्धची ही टी20 मालिका म्हणजे भारताला या सर्वांत लहान स्वरूपाच्या क्रिकेटमधील आपल्यासमोरचे पर्याय पडताळून पाहण्याची सर्वोत्तम संधी आहे. पुढील वर्षी अमेरिकेत (वेस्ट इंडीज आणि अमेरिका) टी20 विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच मालिकेदरम्यान यशस्वी जैस्वालला वापरून पाहणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी वेस्ट इंडीजची टी20 कामगिरी फारशी चमकदार राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना चांगली फलंदाजी करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 11 सामन्यांपैकी तीन सामन्यांचा पावसामुळे निकाल लागलेला नाही आणि उर्वरित आठ सामन्यांपैकी वेस्ट इंडिजने पाच सामने गमावलेले आहेत.
परंतु क्रिकेटच्या दोन पारंपरिक स्वरुपात दर्जा घसरूनही ‘टी20’ क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज ही एक मोठी ताकद राहिलेली आहे. कारण ‘फ्रँचायझी लीग’मध्ये खेळणारे जास्तीत जास्त खेळाडू हे ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिजमधूनच येतात. निकोलस पूरन, काइल मेयर्स, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड हे किमान ‘टी20’ मध्ये अगदी भरात आहेत आणि म्हणूनच भारतीय संघाला सध्याच्या परिस्थितीत या संघाला पराभूत करणे कठीण गेल्यास त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही.
भारताच्या बाजूने विचार करता सूर्यकुमारची एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी खराब झाल्यानंतर त्याला आत्मविश्वास पुन्हा मिळविण्याच्या दृष्टीने एक मोठी खेळी करावी लागेल. प्रतिभा असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केलेल्या सॅमसनची परिस्थिती देखील तशीच आहे. या मालिकेनंतर तो आयर्लंडला जाणार आहे आणि त्यामुळे चांगल्या खेळी करण्याची इच्छा तो बाळगून असेल. गोलंदाजांमध्ये यजुवेंद्र चहलची एकदिवसीय क्रमवारीत थोडी घसरण झालेली असली, तरी त्याला पाचही सामन्यांमध्ये संधी मिळाल्यास तो स्वत:ला सिद्ध करू पाहेल.
शेवटच्या षटकांतील गोलंदाजीच्या बाबतीत अर्शदीप सिंग प्रगतीपथावर आहे, तर मुकेश कुमारने संपूर्ण दौऱ्यात चांगली कामगिरी केलेली आहे. पण कधी तरी आवेश खान आणि उमरान मलिक या दोघांनाही संधी देण्याची आणि ते फारशा पोषक नसलेल्या खेळपट्टीवर काही किमया करून दाखवू शकतात हे पाहण्याची गरज आहे.
संघ : भारत-हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज-रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.
वेळ : सामना रात्री 8 वा. सुरू होईल