भारताचा द.आफ्रिकेवर दणकेबाज विजय
पहिल्याच टी-20 सामन्यात द.आफ्रिका 61 धावांनी पराभूत : सामनावीर संजू सॅमसनचे शतक
वृत्तसंस्था/ दरबान
सामनावीर संजू सॅमसनचे शतक व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात द.आफ्रिकेवर 61 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 बाद 202 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 141 धावांत आटोपला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 10 रोजी होईल.
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात कर्णधार मार्कमला (8) अर्शदीपने बाद करत भारताला यश मिळवून दिले. यानंतर ट्रिस्टन स्टब्ज (11), रिकल्टनही (21) स्वस्तात बाद झाल्याने आफ्रिकेची 3 बाद 44 अशी स्थिती झाली होती. अनुभवी हेन्रिक क्लासेन व डेव्हिड मिलर यांनी 42 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, क्लासेनला 25 धावांवर वरुण चक्रवर्तीने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर ठराविक अंतराने आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा डाव 17.5 षटकांत 141 धावांत आटोपला. आफ्रिकेकडून क्लासेन, रिकल्टन व कोएत्झी वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून रवि बिश्नोई व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करत विजयात मोलाचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला, तो केवळ 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन व कर्णधार सूर्याने 66 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली असताना सूर्या एका खराब चेंडूवर 21 धावांवर बाद झाला. तिलक वर्माने फटकेबाजी करताना 18 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 33 धावांचे योगदान दिले. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.
सॅमसनचे शानदार शतक
दरबानच्या मैदानावर संजूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात वादळी फलंदाजी करत आपले सलग दुसरे टी-20 शतक साजरे केले. त्याने 50 चेंडूत 7 चौकार व 10 षटकारासह 107 धावांची शानदार खेळी साकारली. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक 47 चेंडूत पूर्ण केले. पहिल्या षटकापासून आक्रमक खेळणाऱ्या केरळच्या या युवा फलंदाजांने आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. संजू बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या (2), रिंकू सिंग (11), अक्षर पटेल (7) व रवि बिश्नोई (1) यांनी झटपट विकेट गमावल्या. 15 व्या षटकाच्या अखेरीस संघाची टीम इंडियाची धावसंख्या 3 बाद 167 अशी होती पण टीम इंडियाला पुढच्या 5 षटकात केवळ 35 धावा करता आल्या. जिथे भारत एकेकाळी 230-235 धावसंख्येचे स्वप्न पाहत होता, तिथे शेवटच्या 5 षटकातील कामगिरीने संपूर्ण खेळ खराब केला. भारतीय संघानेही शेवटच्या 5 षटकात 6 विकेट गमावल्या. भारताला 20 षटकांत 8 गडी गमावत 202 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 8 बाद 202 (संजू सॅमसन 107, सूर्यकुमार 21, तिलक वर्मा 33, रिंकू सिंग 11, कोएत्झी 3 बळी, यान्सेन, महाराज, व्रुगर व पीटर प्रत्येकी एक बळी).
द.आफ्रिका 17.5 षटकांत सर्वबाद 141 (रिकल्टन 21, स्टब्ज 11, हेन्रिक क्लासेन 25, यान्सेन 12, कोएत्झी 23, वरुण चक्रवर्ती व रवि बिश्नोई प्रत्येकी तीन बळी).
संजूचा अनोखा विक्रम
द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 लढतीत संजू सॅमसनने शानदार शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीसह टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही अशी कामगिरी आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये करता आलेली नाही. याआधी संजूने बांगलादेशविरूद्ध टी-20 सामन्यात पहिले टी-20 शतक झळकावले होते. यानंतर त्याने सलग पुढील सामन्यात आफ्रिकेविरूद्ध दुसरे शतक झळकावत कोणालाही जमली नाही अशी कामगिरी करून दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन टी 20 सामन्यात शतकं झळकावणारा संजू एकूण चौथा खेळाडू ठरला आहे.
सलग दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शतक झळकावणारे खेळाडू
गुस्ताव मॅकॉन (फ्रान्स) - 2022
रिली रॉस्यू (द.आफ्रिका) - 2022
फिल सॉल्ट (इंग्लंड) - 2023
संजू सॅमसन (भारत) - 2024.