भारताचा आयर्लंडवर दणदणीत विजय
2-0 ने मात : विजयासह ब गटात अव्वलस्थानी : हरमनप्रीतचे दोन गोल
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर 2-0 ने विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ब गटात तीन सामन्यात भारताचा हा दुसरा विजय आहे. 7 गुणासह भारतीय संघ गटात अव्वलस्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाची पुढील लढत गुरुवारी बेल्जियमशी होईल.
पहिल्या सत्रात भारताने चांगली कामगिरी केली. या सत्रात त्यांनी आक्रमणावर भर दिला होता. भारताला 11 व्या मिनिटाला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. यानंतर आठ मिनिटांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष हे हरमनप्रीतवर होते. हरमनप्रीत सिंगने यावेळी पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिले आणि 19 व्या मिनिटाला भारताने दुसरा गोल केला. भारताने गोल केल्यावर आयर्लंडचा संघ यावेळी जोरदार प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत होता. पण यावेळी भारताने चांगला बचाव केला आणि त्यामुळे भारताला मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी टिकवता आली. तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयर्लंडला दोनवेळा गोल करण्याची संधी मिळाली. गोलरक्षक पीआर श्रीजेशने उत्तम बचाव करत आयर्लंडचे प्रयत्न हाणून पाडले. यानंतर शेवटपर्यंत भारताने 2-0 अशी आघाडी कायम ठेवत हा सामना जिंकला. गुरुवारी बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताचा बाद फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न असेल.