बांगलादेशचा अफगाणवर तीन गड्यांनी विजय
झेवाद अब्रार सामनावीर, शिनोझेदाचे शतक वाया
वृत्तसंस्था / दुबई
19 वर्षांखालील वयोगटातील येथे सुरू असलेल्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेतील ब गटात झालेल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणचा 7 चेंडू बाकी ठेवून तीन गड्यांनी पराभव केला. 96 धावा झळकविणाऱ्या बांगलादेशच्या झेवाद अब्रारला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. अफगाणच्या शिनोझेदाचे शतक वाया गेले.
या सामन्यामध्ये अफगाण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणने 50 षटकांत 7 बाद 283 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 48.5 षटकांत 7 बाद 284 धावा जमवित विजयी सलामी या स्पर्धेत दिली.
अफगाणच्या डावामध्ये फैजल शिनोझेदाने शानदार शतक झळकविले. त्याने 94 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 103 धावा जमविल्या. नेझाईने 55 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 44, उस्मान सादतने 50 चेंडूत 5 चौकारांसह 34, मिखीलने 36 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 38 तर अब्दुल अझीजने 16 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. सादात आणि शिनोझेदा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. तसेच सादात बाद झाल्यानंतर निझाईने शिनोझेदा समवेत तिसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागिदारी केली. मिखील आणि अझीज या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 58 धावांची भर घातल्याने अफगाणला 283 धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणच्या डावात 11 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे शहरीयार अहमद आणि इक्बाल हुसेन इमॉन यांनी प्रत्येकी 2 तर साद इस्लाम, बशीर, रिझान हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावाला अब्रार आणि बेग यांनी दमदार सुरूवात करुन दिली. या जोडीने 26.4 षटकांत 151 धावांची दीडशतकी भागिदारी केली. बेगने 68 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 62 धावा जमविल्या. अब्रारने 112 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारांसह 96 धावा झळकविल्या. त्याचे शतक केवळ 4 धावांनी हुकले. कर्णधार हकिम आणि सिद्दकी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. सिद्दकीने 36 चेंडूत 5 चौकारांसह 29 तर हकिमने 48 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 47 धावा जमविल्या. अब्दुल्ला 2 धावांवर तर बशीर एका धावेवर बाद झाले. हे दोन्ही फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाले. परवेजने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा केल्या. रिझान हुसेनने 13 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमवित आपल्या संघाला 7 चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी विजय मिळवून दिला. बांगलादेशच्या डावामध्ये 12 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे स्टेनिक झाई आणि अरब यांनी प्रत्येकी 2 तर सलाम खानने 1 गडी बाद केला. या स्पर्धेतील हा तिसरा सामना होता.
संक्षिप्त धावफलक: अफगाण 50 षटकांत 7 बाद 283 (शिनोझेदा 103, निझाई 44, मिखील नाबाद 38, सादत 34, अझिज नाबाद 26, अवांतर 11, इमॉन व शहरीयार अहमद प्रत्येकी 2 बळी, साद इस्लाम, बशीर, रिझान हुसेन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 48.5 षटकांत 7 बाद 284 (झेवाद अब्रार 96, बेक 62, हकीम 47, सिद्दकी 29, रिझान हुसेन नाबाद 17, शेख परवेज जिबॉन 13, अवांतर 16, स्टेनिकझाई व अरब प्रत्येकी 2 बळी, सलाम खान 1-72)