भारताचा रिकर्व्ह पुरुष संघ अंतिम फेरीत दाखल
वृत्तसंस्था /शांघाय
तरुणदीप राय, धीरज बोम्मदेवरा व प्रवीण जाधव या भारतीय त्रिकुटाने यांनी तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 1 मध्ये पुरुषांच्या सांघिक रिकर्व्हमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. जेतेपदासाठी त्यांची लढत ऑलिम्पिक चॅम्पियन्स कोरियाशी होणार आहे. वैयक्तिक कंपाऊंड विभागात ज्योती व्हेन्नम व प्रियांश यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. कंपाऊंड विभागात भारताच्या पुरुष व महिला तिरंदाज संघांनी अंतिम फेरी गाठत याआधीच दोन पदके निश्चित केली आहेत. भारतीय रिकर्व्ह संघाने उपांत्य फेरीत इटलीवर 5-1 (55-54, 55-55, 56-55) अशी एकतर्फी मात करीत अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या ऑलिम्पिक चॅम्पियन किम वूजिन, ली वू सेऑक, किम जे देऑक यांच्याशी रविवारी होणार आहे. अग्रमानांकन असलेल्या द.कोरियन त्रिकुटाने उपांत्य फेरीत चिनी तैपेईच्या टॅन चिह चुन, लिन झिह सियांग व ताय यु सुआन यांच्यावर 6-0 (57-50, 58-56, 58-54) अशी एकतर्फी मात केली. कंपाऊंड विभागात प्रियांश व आशियाई क्रीडा स्पर्धेतील विद्यमान विजेती ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनीही वैयक्तिक विभागात उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या द्वितीय मानांकित भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने एका सेटची पिछाडी भरून काढत 15 व्या मानांकित इंडोनेशियावर 5-3 अशा फरकाने मात केली. त्याआधीच्या फेरीत त्यांनी स्पेनचा 5-1 असा पराभव केला करीत उपांत्य फेरी गाठली होती.
महिलांच्या विभागात भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर यांना पहिल्याच फेरीत मेक्सिकोच्या संघाकडून 3-5 अशी हार पत्करावी लागली. पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली होती. पण ती त्यांना राखता आली नाही आणि त्यांना 50-50, 55-49, 51-54, 52-54 असा पराभव पत्करावा लागला. नंतर ज्योती व्हेन्नमने आपल्याच देशाच्या अवनीत कौरचा 143-142 असा पराभव करून वैयक्तिक कंपाऊंडमध्ये उपांत्य फेरी गाठली. ज्योतीची पुढील लढत इस्टोनियाच्या मीरी मार्टिया पास हिच्याशी होईल. युवा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन आदी स्वामीला मात्र मेक्सिकोच्या अग्रमानांकित आंद्रेया बेसेराकडून उपांत्यपूर्व फेरीत 142-144 असा पराभव स्वीकारावा लागला. 14 व्या मानांकित प्रियांशने तुर्कीच्या बतुहान अॅकावग्लूचा शूट ऑफमध्ये पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. दोघांनी 145-145 गुण मिळवित बरोबरी साधली होती. टायब्रेकरमध्ये 21 वर्षीय प्रियांशने दोनदा 10, 10 गुण मिळविले तर अॅकावग्लूने 10 व 9 असे गुण नोंदवले. कॅपर्सने भारताच्या प्रथमेश फुगेवर 149-147 अशी मात करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अनुभवी अभिषेक शर्माला मात्र दुसऱ्या फेरीतच फ्रान्सच्या जीन फिलिप बोल्शकडून पराभूत झाला तर रजत चौहानला प्रियांशने हरविले. दुसऱ्या फेरीत हरविले होते.