शस्त्रास्त्र विक्रीमध्ये भारताची विक्रमी झेप
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान संरक्षण मंत्रालयाकडून आनंदाची बातमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण आघाडीवर भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. परदेशात शस्त्रास्त्रे विकण्यात देशाने मोठी झेप घेतली आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या काळातही भारताने संरक्षण निर्यातीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’साठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारताची संरक्षण निर्यात गेल्या आर्थिक वर्षात 23,622 कोटी रुपयांची (सुमारे 2.76 अब्ज डॉलर्स) विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. मागील आर्थिक वर्षाच्या 21,083 कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ 12.04 टक्के म्हणजेच 2,539 कोटी रुपयांनी अधिक आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाने ‘मेक इन इंडिया’ शस्त्र प्रणालीची अचूकता अधोरेखित केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अ•dयांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. शेजारी देशाने ड्रोन हल्ले केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर हल्ला केला. तसेच पाकिस्तानी सैन्याने केलेले अनेक क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले भारताने परतवून लावत भारतीय शस्त्रास्त्रांची चुणुक संपूर्ण जगाला दाखवून दिली होती.
संरक्षण मंत्रालयाचे ट्विट
भारताकडून अनेक देशांना संरक्षण सामुग्री निर्यात केली जाते. यासंबंधीची 2024-25 या वर्षातील आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने त्यासंबंधीची माहिती ट्विट केली आहे. “भारत सुमारे 80 देशांमध्ये निर्यात करतो, 2029 पर्यंत 50,000 कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवून, जागतिक संरक्षण उत्पादनात आपली उपस्थिती मजबूत करतो,” अशी पोस्ट संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’वर केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मधील 686 कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 मधील हा आकडा 23,622 कोटी रुपये आहे. गेल्या 11 वर्षात ही वाढ 34 पटीने वाढली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्यात कामगिरीत 42.85 टक्के वाढ झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने एप्रिलमध्ये दिलेल्या एका पूर्वीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. भारताची ही कामगिरी स्वदेशी संरक्षण उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली मजबूत स्वीकृती आणि जागतिक पुरवठा नेटवर्कमध्ये एकत्रित होण्याची या क्षेत्राची क्षमता दर्शवते, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
भारताच्या लष्करी क्षमतेत बदल
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये खासगी क्षेत्राचे योगदान 15,233 कोटी रुपये होते, तर डीपीएसयूने 8,389 कोटी रुपयांची निर्यात केली. हे आकडे आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत सुधारणा दर्शवतात. 2023-24 मध्ये खासगी क्षेत्रातील निर्यात 15,209 कोटी रुपये आणि डीपीएसयू निर्यात 5,874 कोटी रुपये होती. भारताने आपल्या लष्करी क्षमतांमध्ये बदल केले आहेत. मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून न राहता देशांतर्गत उत्पादन आणि स्वावलंबनावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. यातूनच संरक्षण निर्यातीत भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. दारूगोळा, शस्त्रs, प्रणाली, उपप्रणाली आणि विविध घटकांसह अनेक लष्करी उपकरणे यशस्वीरित्या वितरित केली आहेत.