चीनमधील टेटे स्पर्धेत भारताचा सहभाग
वृत्तसंस्था/ चेंगडू
चीनमधील चेंगडू येथे 1 ते 8 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 2024 च्या आयटीटीएफच्या मिश्र सांघिक विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय टेटे संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टेटे संघाचे नेतृत्व मनुष शहा करत आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय टेटे संघामध्ये मनुष शहा, मानव ठक्कर, पी. वैष्य हे अनुभवी टेबल टेनिसपटू असून मनिका बात्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, शरथ कमल आणि जी. साथियान यांचा समावेश आहे. मात्र शरथ कमल आणि जी. साथियान हे दोन अनुभवी टेबल टेनिसपटू या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सांगण्यात आले. भारताच्या नवोदित टेबल टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय शरथ कमल आणि साथियान यांनी घेतला आहे.
आयटीटीएफची ही मिश्र सांघिक विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धा गेल्या वर्षी चेंगडूमध्ये पहिल्यांदाच भरविण्यात आली होती आणि चीनने जेतेपद मिळविले होते. रविवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 देशांचे स्पर्धक सहभागी झाले असून ही स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सहभागी संघ 4 गटात विभागण्यात आले असून त्यांच्यातील सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविले जातील. या चार गटातील प्रत्येकी आघाडीचे दोन संघ दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतील. या स्पर्धेत भारताला सातवे मानांकन देण्यात आले आहे.