मिश्र सांघिक विश्वचषक टेटे स्पर्धेत भारताचा सहभाग,
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चीनमध्ये होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ लुसाने, स्वित्झर्लंड
आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत भारतीय संघ भाग घेणार असून यजमान चीनसह एकूण 16 संघ त्यात सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनने (आयटीटीएफ) या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची यादी शुक्रवारी जाहीर केली. ही स्पर्धा चीनमधील चेंगडू येथे 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यजमान चीन संघ या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अन्य 14 संघांत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चिनी तैपेई, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, जपान, द.कोरिया, पोलंड, रोमानिया, सिंगापूर, स्वीडन, अमेरिका यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत तीन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात 16 संघांचे चार गट करण्यात येतील. सर्वोच्च मानांकित संघ वेगवेगळ्या गटात ठेवण्यात येतील. उर्वरित संघांपैकी त्यांच्या मानांकनानुसार स्नेक सिस्टिमप्रमाणे दोन संघांना स्थान दिले जाईल. प्रत्येक गटातील सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविले जातील.
दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील अव्वल दोन संघ या टप्प्यात खेळतील. यात एकूण 8 संघ असतील. या आठ संघांत राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होतील. मात्र पहिल्या टप्प्यात एकमेकांविरुद्ध खेळलेले संघ या टप्प्यात पुन्हा आमनेसामने येणार नाहीत. त्यांचे आधीचे निकाल या टप्प्यात विचारात घेतले जातील. दुसऱ्या टप्प्यातील पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ बाद फेरीचा तिसरा टप्पा खेळतील. या टप्प्यात उपांत्य सामने व विविध क्रमांकाचे सामने होतील. मानांकनानुसार उपांत्य फेरीचे संघ ठरतील. म्हणजे पहिला क्रमांकावरील संघ चौथ्या क्रमांकावरील संघाविरुद्ध खेळेल तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे संघ दुसरा उपांत्य सामना खेळतील. विजेत्याला सुवर्ण व तिसऱ्या क्रमांकास कांस्यपदक दिले जाणार आहे. पुरुष, महिला एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी सामने खेळविले जातील. चार टप्प्यात मिळून एकूण 52 सामने होणार आहेत. या वेगळ्या फॉरमॅटमुळे जेतेपदासाठी प्रत्येक संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे.