भारताचा मलेशियावर एकतर्फी विजय महिला
वृत्तसंस्था/ राजगिर, बिहार
युवा स्ट्रायकर संगीता कुमारीने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत विद्यमान विजेत्या मलेशियाचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित विजयी सलामी दिली.
संगीताने 8 व 55 व्या मिनिटाला असे दोन तर प्रीती दुबेने 43 व्या व उदिताने 44 व्या मिनिटाला भारताचे उर्वरित दोन गोल नोंदवले. मंगळवारी भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाशी होईल. सोमवारी झालेल्या अन्य सामन्यात जपान व कोरिया यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली तर विद्यमान ऑलिम्पिक रौप्यविजेत्या चीनने थायलंडचा 15-0 अशा फडशा पाडला.
भारतीय महिलांनी प्रारंभापासूनच सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजविले. मात्र पहिल्या सत्रात मलेशियाला गोलच्या दिशेने फटका मारण्याची पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात संघी मिळाली होती. त्यानंतर मात्र भारताचेच सामन्यावर पूर्ण नियंत्रण राहिले. वारंवार आक्रमणे करीत भारताने मलेशियाला दबावाखाली ठेवले. भारताने दोन मिनिटात दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यातील दुसऱ्यावर संगीताने दुसऱ्या प्रयत्नात गोल नोंदवला. प्रीतीला ही आघाडी वाढवण्याची दोनदा संधी मिळाली होती. तिचा फटका गोलरक्षिकेने थोपवला तर दुसरा फटका तिने गोलपोस्टला साईडबारला मारला. पहिले सत्र संपण्याच्या काही सेकंद आधी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण तो वाया गेला.
दुसऱ्या सत्रात गोल झाला नाही. पण तिसऱ्या सत्रात प्रीती व उदिता यांनी लागोपाठ गोल नोंदवले. चौथ्या सत्रात सामना संपवण्यास पाच मिनिटे असताना संगीताने रिव्हर्स फटक्यावर शानदार मैदानी गोल नोंदवत भारताच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केला.