भारताचा इंग्लंडवर एकतर्फी मालिकाविजय
शेवटच्या वनडेत 142 धावांनी मात, मालिकावीर-सामनावीर गिलचे शतक
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सामनावीर व मालिकावीर शुभमन गिलचे तडाखेबंद शतक, श्रेयस अय्यर व कोहली यांची अर्धशतके आणि सर्वच गोलंदाजांनी केलेला शिस्तबद्ध मारा यांच्या बळावर भारताने तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा 142 धावांनी धुव्वा उडवित मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने निर्धारित 50 षटकांत सर्व बाद 356 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर इंग्लंडचा डाव 34.2 षटकांत 214 धावांत गुंडाळून एकतर्फी मालिकाविजय साकार केला. इंग्लंडविरुद्ध धावांच्या बाबतीत मिळविलेला भारताचा हा दुसरा मोठा विजय आहे. इंग्लंडला बेन डकेट (34) व फिल सॉल्ट (23) यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. 2 बाद 84 अशा स्थितीनंतर स्पिनर्सपुढे नंतरचे फलंदाज पुन्हा एकदा ढेपाळले आणि 35 व्या षटकात त्यांचा डाव आटोपला. टॉम बॅन्टनने 41 चेंडूत 38, रूटने 24, गस अॅटकिन्सनने 19 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 38, ब्रूकने 19 धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 2, वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांनी एकेक बळी टिपला.
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार जोस बटलरचा हा निर्णय मात्र भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. भुवनेश्वर सामन्यात शतकी खेळी साकारणारा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला सावरले. तब्बल दीड वर्षानंतर विराटने वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. विराटने 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावांची खेळी साकारली. सुरुवातीला त्याने संयमाने फलंदाजी केली पण सेट झाल्यानंतर त्याने फ्लिकपासून कव्हर ड्राईव्हपर्यंत सर्व शॉट खेळले. अर्धशतकानंतर मात्र तो रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला.
शुभमनचे सातवे वनडे शतक
अहमदाबादमध्ये शुभमन गिल मैदानावर उतरला, तेव्हा तो आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता. गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधील त्याची उत्कृष्ट खेळी. त्याच्या बॅटने नागपूर आणि कटकमध्ये आधीच पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यातही गिलने वेगवान फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्याने 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर विराटसोबत शतकी भागीदारीही पूर्ण केली. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर गिलने पुन्हा एकदा टीम इंडियाची धुरा सांभाळली. गिलने पुढील पन्नास धावा 44 चेंडूत पूर्ण केल्या आणि सातवे एकदिवसीय शतक पूर्ण केले. गिलने 102 चेंडूत 14 चौकार व 3 षटकारासह 112 धावांची शानदार खेळी साकारली. यादरम्यान, त्याने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी साकारली. या दोघांनही इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. शतकानंतर गिल आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर अय्यरने अर्धशतकी खेळी साकारताना 64 चेंडूत 78 धावांची वादळी खेळी साकारली. श्रेयसचे हे मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले.
अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुलने 40 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने 13, वॉशिंग्टन सुंदरने 14 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्याला मोठी खेळी साकारता आली नाही. हर्षित राणाने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला पण तोही 13 धावा काढून माघारी परतला. यानंतर टीम इंडियाचा डाव 356 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत सर्वबाद 356 (शुभमन गिल 112, विराट कोहली 52, श्रेयस अय्यर 78, केएल राहुल 40, हार्दिक पंड्या 17, अक्षर पटेल 13, वॉशिंग्टन सुंदर 14, हर्षित राणा 13, आदिल रशीद 4 बळी, मार्क वूड 2 बळी, जो रुट, मेहमूद व अॅटकिन्सन प्रत्येकी एक बळी).
इंग्लंड 33.5 षटकांत सर्व बाद 214 : डकेट 34, अॅटकिन्सन 38, बॅन्टन 38, रूट 24, सॉल्ट 23, ब्रूक 19, अर्शदीप 2-33, हर्षित राणा 2-31, अक्षर पटेल 2-22, हार्दिक पंड्या 2-38, कुलदीप 1-38, सुंदर 1-43.
रोहितनंतर विराटही फॉर्ममध्ये परतला, कोहलीचा आणखी एक विक्रम
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 16 धावांचा टप्पा गाठताच, विराट कोहलीने इंग्लिश संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या. तो इंग्लंडविरुद्ध 4000 धावा करणारा पहिला भारतीय ठरला. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याआधी, सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय होता. तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध 3990 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू
4000 - विराट कोहली
3990 - सचिन तेंडुलकर
2999 - एमएस धोनी
शुभमन गिलची विक्रमी खेळी
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात इतिहास रचला आहे. गिल हा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा फलंदाज बनला आहे. गिलने त्याच्या 50 व्या डावात एकदिवसीय सामन्यात 2500 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करताना गिलने हाशिम अमलाचा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडला आहे. हाशिम अमलाने एकदिवसीय सामन्याच्या 51 व्या डावात 2500 धावा पूर्ण केल्या.
वनडे इतिहासात सर्वात जलद 2500 धावा करणारे खेळाडू
50 डाव : शुभमन गिल
51 डाव : हाशिम आमला
52 डाव : इमाम उल हक