भारताकडून द.कोरियाचा एकतर्फी धुव्वा
अर्शदीपची हॅट्ट्रिक, 8-1 फरकाने भारताचा विजय
वृत्तसंस्था/ मस्कत, ओमान
भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केली असताना शेवटच्या गट साखळी सामन्यात दक्षिण कोरियाचा 8-1 असा एकतर्फी धुव्वा उडविला. अर्शदीप सिंगने हॅट्ट्रिक नोंदवली. भारताने गट अ मध्ये सर्व साखळी सामने जिंकत अग्रस्थान मिळविले.
अर्शदीपने 9, 44 व 60 व्या मिनिटाला गोल नोंदवत हॅट्ट्रिक पूर्ण केली. याशिवाय अरायजीत सिंग हुंदालने (तिसरे व 37 वे मिनिट) 2, गुरज्योत सिंग (11 वे मिनिट), रोशन कुजुर (27 वे मिनिट), रोहित (30 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. कोरियाचा एकमेव गोल 18 व्या मिनिटाला किम ताएह्योऑनने केला. भारताने चार सामने जिंकत 12 गुण मिळविले. जपाननेही अ गटातून उपांत्य फेरी गाठली असून त्यांनी एकूण 9 गुण मिळविले. त्यांनी 3 सामने जिंकले तर भारताविरुद्ध त्यांना एकमेव पराभव स्वीकारावा लागला. भारताची उपांत्य लढत ब गटात दुसरे स्थान मिळविणाऱ्या मलेशियाविरुद्ध मंगळवारी होणार आहे. मलेशियाने चार सामन्यांत 7 गुण मिळविले. ब गटातील शेवटच्या सामन्यात मलेशियावर 4-1 असा विजय मिळविणाऱ्या पाकिस्तानने चारही सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान मिळविले. त्यांची उपांत्य लढत जपानविरुद्ध होणार आहे.
जपानविरुद्धच्या सामन्यात भारताने तिसऱ्याच मिनिटाला आघाडी घेतली. हुंदालने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. त्यानंतर अर्शदीप व गुरज्योत यांनी लागोपाठ मैदानी गोल नोंदवत भारताची आघाडी वाढवली. दुसऱ्या सत्रात कोरियाने थोडाफार प्रतिकार केला आणि किमने त्यांचा एकमेव गोल नोंदवला. 18 व्या मिनिटाला त्याने हा मैदानी गोल केला. 27 व्या मिनिटाला रोशन कुजुर भारताला 3 गोलांची आघाडी पुन्हा मिळवून दिली. मध्यंतराच्या ठोक्याला रोहितने ही आघाडी 5-1 अशी केली. उत्तरार्धातील सातव्या मिनिटाला हुंदालने मैदानी गोल नोंदवला तर तिसरे सत्र संपण्याच्या सुमारास अर्शदीपने वैयक्तिक दुसरा करीत भारताची आघाडी 7-1 अशी केली. सामना संपण्यास काही सेकंद असताना अर्शदीपने हॅट्ट्रिक पूर्ण करताना शानदार मैदानी गोल नोंदवला. भारताला या सामन्यात 5 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले, त्यापैकी दोनवर गोल झाले.
पुढील वर्षी होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेसाठी ही पात्रता स्पर्धा असून यजमान असल्याने भारत या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे. येथील स्पर्धेत पहिले सहा क्रमांक मिळविणारे ज्युनियर वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत. सातव्या क्रमांकाचा संघही पात्र ठरणार आहे. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.