दुर्मिळ खनिजासाठी भारताची पुढची तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनकडून दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर भारताने आता यासाठी इतर पर्यायांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. भारत आता या खनिजांची आयात जपान व व्हिएतनाम यांच्याकडून करण्याची तयारी करत असल्याचे समजते. यासंदर्भात भारत दोन देशांसोबत चर्चा करत आहे, अशीही माहिती आहे. यासोबत भारत आता दुर्मिळ खनिजांच्या उत्पादनातही वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चीनने अलीकडेच खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. दुर्मिळ खनिजांचे चुंबकात रुपांतर करण्यासाठी प्रोत्साहन योजना आणण्याची तयारी सरकारची आहे. ही योजना लागू होण्यास 2 वर्षे लागू शकतात, असे म्हटले जात आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पुढील 15 ते 20 दिवसात या योजनेवर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने आयात शुल्क आकारणीची घोषणा केल्यानंतर उत्तरादाखल बीजिंगने 4 एप्रिलपासून अवजड व मध्यम दुर्मिळ खनिजे व चुंबक यांच्या निर्यातीवर बंदी घातली. हे घटक संरक्षण, ऊर्जा व ऑटोमोटीव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले जातात. अणुऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या भारतीय रेयर अर्थ्स लिमिटेड यांच्याकडे देशातील दुर्मिळ खनिजांचा साठा असतो. यांच्याकडे वर्षाकाठी 1500 टन चुंबक उत्पादनाची क्षमता आहे. भारत आता जपान व व्हिएतनाम या देशांकडून दुर्मिळ खनिजे मागवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत आहे, असे अवजड उद्योग मंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.