For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा नवा विक्रम

06:50 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा नवा विक्रम
Advertisement

भारत प.डाव 6 बाद 603 डाव घोषित, द. आफ्रिका 4 बाद 236

Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

येथे सुरू असलेल्या महिलांच्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान भारताने दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या डावात 603 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर द. आफ्रिकेने शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसा अखेर पहिल्या डावात 4 बाद 236 धावा जमविल्या. महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही विक्रमी सर्वोच्च धावसंख्या आहे.

Advertisement

या कसोटी सामन्यात भारताने आपला महिला डाव 6 बाद 603 धावांवर घोषित केला. भारताच्या डावामध्ये शेफाली वर्माने द्विशतक (205), स्मृती मानधनाने शतक (149) तसेच रॉड्रिग्ज, हरमनप्रित कौर आणि रिचा घोष यांनी अर्धशतके झळकवली. भारताने 4 बाद 525 या धाव संख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली. कौरने आपले अर्धशतक 2 चौकारांच्या मदतीने 89 चेंडुत तर घोषने आपले अर्धशतक 11 चौकारांसह 54 चेंडूत झळकविले. या दोघींनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागिदारी 106 चेंडूत नोंदविली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 143 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेच्या सेखूखुनेने कौरला पायचित केले. तीने 115 चेंडुत 4 चौकारांसह 69 धावा जमविल्या. यानंतर मलबाने घोषला पायचित केले. घोषने 90 चेंडुत 16 चौकारांसह 86 धावा जळकविल्या. भारताच्या 600 धावा 686 चेंडूत नोंदविल्या गेल्या. उपाहारापूर्वीच भारताने आपल्या पहिल्या डावाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे टकेरने 2 तर डी क्लर्क, सेखुखुने आणि मलबा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

 

द. आफ्रिकेने आपल्या डावाला सावध सुरूवात केली आणि उपाहारापर्यंत त्यांनी बिनबाद 29 धावा  जमविल्या. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर स्नेह राणाने कर्णधार वूलव्हर्टला पायचित केले. तीने 36 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. बॉश्च आणि लुस या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. स्नेह राणाने चहापानापूर्वीच द. आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना बॉश्चला शर्माकरवी झेलबाद केले. तिने 73 चेंडुत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 39 धावा जमविल्या. चहापानावेळी द. आफ्रिकेने 31.5 षटकांत 2 बाद 106 धावा जमविल्या होत्या.

चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये द. आफ्रिकेने आणखी दोन गडी गमविले. लुस आणि कॅप या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागिदारी केली. पण दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर लुस पायचित झाली. तिने 164 चेंडुत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 65 धावा जमविल्या. स्नेह राणाने टकेरला खाते उघडण्यापूर्वीच घोषकरवी झेलबाद केले. द. आफ्रिकेची टीम यावेळी 4 बाद 198 अशी होती. कॅप आणि डी क्लर्क यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली आहे. 72 षटकांत दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 236 धावा जमविल्या. कॅप 8 चौकारांसह 69 तर डी क्लर्क 5 चौकारांसह 27 धावांवर खेळत आहेत. भारतातर्फे स्नेह राणाने 61 धावांत 3 तर दिप्ती शर्माने 40 धावांत 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस  बाकी असून दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप 347 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत. या सामन्यात पहिल्या दोन दिवसांमध्ये भारताने आपले वर्चस्व राखले आहे.

भारताचा विक्रम

महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये भारतीय महिला संघाने सर्वोच्च धावांचा विश्वविक्रम नोंदविला आहे. द. आफ्रिका विरुध्दच्या या एकमेव कसोटीत त्यांनी 603 धावा जमविल्या आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये 9 बाद 575 धावांचा विश्वविक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाचा हा विश्वविक्रम भारताने मोडीत काढला. त्याच प्रमाणे महिला संघाने कसोटी क्रिकेटमध्ये दिवसभराच्या खेळात 4 बाद 525 ही विक्रमी सर्वोच्च धावांची कामगिरी करताना 2002 साली कोलंबोमध्ये पुरूषांच्या कसोटीत लंकन संघाने बांगला देश विरुध्द एका दिवसांत 9 बाद 509 धावांचा नोंदविलेला विक्रम भारतीय महिला संघाने मागे टाकला.

संक्षिप्त धावफलक

भारत प. डाव- 115.1 षटकात 6 बाद 603 डाव घोषित (शेफाली वर्मा 205, स्मृती मानधना 149, रॉड्रिग्ज 55, हरमनप्रित कौर 69, रिचा घोष 86, शुभा सतीश 15, अवांतर 22, टकेर 2-141, डी क्लर्क 1-79, सेखुखुने 1-70, मलाबा 1-122), द. आफ्रिका प. डाव 72 षटकात 4 बाद 236 (लुस 65, वूलव्हर्ट 20, बॉश्च 39, कॅप खेळत आहे 69, डी क्लर्क खेळत आहे 27, अवांतर 16, स्नेह राणा 3-61, दिप्ती शर्मा 1-40)

Advertisement
Tags :

.