इंग्लंडविरुद्धच्या ‘टी-20’ लढतीतून आज भारताची नवी सुरुवात
मोहम्मद शमीच्या पुनरागमनावर लक्ष, कसोटींतील दारुण पराभवांची भरपाई करण्याचा यजमानांचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ कोलकाता
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-20 संघ आज बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळणार असून यावेळी तंदुरुस्त झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष असेल. या मालिकेत अलीकडील कसोटी सामन्यांतील दारुण पराभवांची भरपाई करण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल.
पाच टी-20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने होणार असून पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघ रचनेसंदर्भात प्रयोग करण्यासाठी आणि खेळाडूंच्या फॉर्मचे मूल्यांकन करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हे एक आदर्श व्यासपीठ आहे. चार सामने गमावल्यानंतरही शमी 2023 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात भारताचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज म्हणून उदयास आला होते. त्याने वानखेडे येथे न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 57 धावांत 7 बळी घेतले होते. विशेष म्हणजे या वेगवान गोलंदाजाने त्याच्या मर्यादित टी-20 कारकिर्दीत 29.62 च्या सरासरीने 24 बळी घेतले आहेत आणि तो यावेळी त्याची तंदुरुस्ती सिद्ध करताना त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल.
19 नोव्हेंबर, 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर शमीवर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याने त्याला बाजूला ठेवण्यात आले होते. त्यातून सावरून काही आठवड्यांपूर्वी स्थानिक संघात पुनरागमन केल्यानंतर त्याच्या डाव्या गुडघ्यावर सूज आली होती. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघात समावेश केलेला असल्याने शमीचे पुनरागमन सर्वांचे लक्ष वेधून घेईल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीची दुखापत झाली आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या सहभागाबद्दल शंका आहे. त्यामुळे शमीचे पुनरागमन अधिक महत्त्वाचे आहे.
34 वर्षीय शमीने बंगालतर्फे रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करताना सात बळी मिळवून संघाला मोसमातील पहिला विजय नोंदविण्यास मदत केली. त्यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (11 बळी) आणि विजय हजारे ट्रॉफी (पाच बळी) यामध्येही प्रभावी कामगिरी केली. शमीची टी20 कारकीर्द अनियमित राहिली असून 2014 मध्ये पदार्पणानंतर तो फक्त 23 सामने खेळलेला आहे. या स्वरुपातील त्याचा शेवटचा सामना 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धचा होता.
अक्षरची नवी सुरुवात
अष्टपैलू अक्षर पटेल टी-20 तील भारताचा उपकर्णधार म्हणून या मालिकेत पदार्पण करेल. गेल्या वर्षी कॅरिबियनमध्ये भारताच्या विजयी टी-20 विश्वचषक मोहिमेतील् उत्कृष्ट अष्टपैलू योगदानाबद्दल त्याला हे बक्षीस मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात अक्षरने 31 चेंडूंत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती आणि स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये 19.22 च्या सरासरीने नऊ बळी घेतले होते. गुजरातच्या या खेळाडूने सामन्याच्या परिस्थितीनुसार आपण तिसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत कुठेही येऊन खेळू शकतो हे दाखवून दिलेले आहे.
संजू सॅमसनवरही राहील नजर
सर्वांच्या नजरा केरळच्या संजू सॅमसनवरही असतील. कारण भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याला स्थान देण्यात आले नसून मध्यप्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यातही केरळच्या निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. या यष्टीरक्षक फलंदाजाने अनेक वेळा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडच्या मालिकेत सलग टी-20 शतके झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. डिसेंबरमध्ये मेलबॉर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावलेला अष्टपैलू नितीश रेड्डी यालाही संघात स्थान मिळाले आहे. यामुळे संघाला हार्दिक पंड्यासह वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून आणखी एक पर्याय मिळाला आहे.
इंग्लंडसाठीही नवी सुरुवात
मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलमच्या मार्गदर्शनाखालील आणि जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडसाठीही सदर मालिका एक नवीन अध्याय आहे ठरणार आहे. टी-20 विश्वचषकातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर मॅथ्यू मॉटने राजीनामा दिला होता. त्यानंतर मॅकलमकडे तीन वर्षांचा करार करण्यात आला होता. आक्रमक ‘बाझबॉल’ दृष्टिकोनाने कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती घडविण्यासाठी ओळखला जाणारा मॅकलम आता मर्यादित षटकांच्या स्वरूपात त्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडला प्रमुख खेळाडू रीस टोपली, सॅम करन आणि विल जॅक्सची कमतरता भासेल, परंतु गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविऊद्धच्या एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी केलेला 21 वर्षीय जेकब बेथेल येथे चमक दाखवू शकतो.
शमीप्रमाणेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्यांच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करण्यासाठी दुखापतीतून परतल्याने चर्चेत आहे. परंतु भारतातील परिस्थिती पाहता संध्याकाळी जोरदार दव पडण्याची शक्यता असल्याने गोलंदाजांसाठी ते आव्हान निर्माण करू शकते. दुखापतीतून ठीक झालेला वेगवान गोलंदाज मार्क वूडलाही संघात समाविष्ट केले आहे.
टी-20 व एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
बुधवारच्या सामन्यानंतर दुसरी टी-20 लढत (25 जानेवारी) चेन्नईत होईल. त्यानंतर राजकोट (28 जानेवारी), पुणे (31 जानेवारी) आणि मुंबई (2 फेब्रुवारी) येथे सामने होतील. एकदिवसीय सामन्यांची सुरुवात 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये होईल. त्यानंतर कटक (9 फेब्रुवारी) आणि अहमदाबाद (12 फेब्रुवारी) येथे सामने होतील.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, आदिल रशीद, साकिब महमूद आणि मार्क वूड.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने स्टार