भारताचा जपानवर निसटता विजय
वृत्तसंस्था/ मस्कत (ओमान)
येथे सुरु असलेल्या 2024 च्या कनिष्ठ पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील शनिवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने जपानचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतातर्फे थोकचोम किंगसन सिंगने 12 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर जपानच्या नेओ सॅटोने 15 व्या मिनिटाला मैदानी गोल करुन भारताशी बरोबरी साधली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर भारताच्या रोहितने सामन्यातील 36 व्या मिनिटाला गोल केला. भारताने यावेळी पुन्हा जपानवर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. भारताला ही आघाडी फार वेळ राखता आली नाही. 38 व्या मिनिटाला सॅटोने आपला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल केला. पुन्हा हा सामना बरोबरीत आल्याने शेवटच्या 20 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर आधिक भर दिला होता. 39 व्या मिनिटाला अर्जित सिंगने भारताचा तिसरा आणि निर्णायक गोल करुन जपानचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना चीन तैपेई बरोबर खेळविला जाणार आहे.