भारताची आज नेदरलँड्सविरुद्ध लढत
कोहलीला विक्रमी शतकाची संधी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय संघाची विद्यमान विश्वचषकातील मोहीम धडाकेबाज राहिलेली असून आज रविवारी अंतिम लीग सामन्यात नेदरलँड्सशी खेळताना ही विजयी घोडदौड कायम राखण्याची इच्छा ते बाळगून असतील. हा सामना म्हणजे विराट कोहलीला विक्रमी 50 वे अर्धशतक नोंदविण्याची उत्तम संधी असेल. भारताने उपांत्य फेरीसाठी आधीच पात्रता मिळवली आहे, तर नेदरलँड्सचे आव्हान कधीच संपुष्टात आलेले आहे.
नेदरलँड्सविरुद्ध काही सांघिक टप्पे गाठताना आपली गती कायम राखण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाईल. त्यामुळे या टप्प्यावर संघात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता कमी आहे. विराट कोहलीने कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती आणि आता प्रतीक्षा त्याच्या 50 व्या शतकाची चालली आहे. आतापर्यंत त्याने विश्वचषकात 543 धावा केल्या असून भारतीय फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात 500 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सांघिक दृष्टिकोनातून पाहिल्यास व्यवस्थापनाला सूर्यकुमार यादवकडून चांगली खेळी होण्याची अपेक्षा असेल. त्याने चार सामन्यांत 21.25 च्या सरासरीने केवळ 85 धावा केल्या आहेत. या भारतीय फलंदाजीतील तो एकमेव कच्चा दुवा राहिलेला असून इतर प्रमुख फलंदाजांनी किमान एक अर्धशतक नोंदविलेले आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडल्याने सूर्यकुमार संघात पोहोचलेला असला, तरी त्याला अद्याप या संधीचा फायदा घेता आलेला नाही. नेदरलँड्सविरुद्ध ही परिस्थिती सुधारण्याची त्याला चांगली संधी आहे.
भारताच्या सलग आठ विजयांत आणखी एक गोष्ट थोडीशी दुर्लक्षित झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी तीन वेळा 50 हून जास्त धावांची भागीदारी केलेली असली, तरी इतर पाच सामन्यांमध्ये ही जोडी लवकर फुटलेली आहे. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्धची संधी पाहता या जोडीकडूनही भक्कम भागीदारीची अपेक्षा असेल. तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश असलेली भारतीय गोलंदाजी मात्र विलक्षण प्रभावी राहिली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धावा काढणे अवघड करून ठेवलेले आहे. परंतु सिराजकडून थोड्या अधिक सातत्याची व्यवस्थापनाला अपेक्षा असेल.
डच संघाकडे लोगान व्हॅन बीक, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकेरेन हे काही सक्षम गोलंदाज आहेत, परंतु चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर त्यांना मजबूत भारतीय फलंदाजीला रोखणे कठीण जाईल. तेजा निदामनुऊ, मॅक्स ओ’डॉड आणि वेस्ली बॅरेसीसारख्या त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाजांना या स्पर्धेत संघर्ष करावा लागलेला असून भारतीय माऱ्याचा सामना करणे त्यांना खूप जड जाऊ शकते.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव.
नेदरलँड्स : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुऊ, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.