भारताचे शेर ऑस्ट्रेलियात झाले ढेर
टीम इंडिया 107 धावांत गारद : ऋतुराज, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरनसह सारेच ठरले फेल
वृत्तसंस्था/मॅके (ऑस्ट्रेलिया)
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तयारीचा भाग म्हणून भारत अ संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु झाला आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात फारशी आशादायक झालेली नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईश्वरन, इशान किशन, देवदत्त पडिक्कलसह इतर भारतीय खेळाडू कांगारुसमोर सपशेल ढेर झाले. ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात भारत अ संघाला अवघ्या 107 धावांत ऑलआऊट केले. प्रत्युतरात ऑस्ट्रेलिया अ संघाची सुरुवातही खराब झाली असून पहिल्या दिवसअखेरीस त्यांनी 4 बाद 99 धावा केल्या आहेत. कर्णधार नॅथन मॅकस्विनी 29 तर कूपर कॉनोली 14 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज बकिंगहॅमने ऋतुराजला बाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेला अभिमन्यू ईश्वरन पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. आठव्या षटकात बकिंगहॅमने अभिमन्यूला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला 30 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या. रणजी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या साई सुदर्शनने 21 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने 36 धावांची संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.
इशान किशन, बाबा इंद्रजीतही फेल
गेली अनेक वर्ष स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या बाबा इंद्रजीतला मोठी खेळी करण्यात अपयश आले. 9 धावा काढून तो बाद झाला. राष्ट्रीय संघातून बाहेर फेकला गेलेला इशान किशन सध्या पुनरागमनच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्यासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. पण तोही सपशेल अपयशी ठरला. त्याला 4 धावा करता आल्या. अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळालेल्या नितीश कुमार रे•ाrला भोपळाही फोडता आला नाही. नितीश कुमार बाद झाला तेव्हा भारत अ संघाची 7 बाद 79 अशी स्थिती होती. भारतीय डाव 100 च्या आत मर्यादित राहील असे वाटत होते पण शेवटी नवदीप सैनीने 43 चेंडूत 23 धावा करत संघाची धावसंख्या 107 पर्यंत नेली. त्याची विकेट पडताच भारताचा डाव संपला. विशेष म्हणजे, भारताच्या केवळ तीनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियासाठी ब्रेंडन डोगेटने सर्वाधिक 6 गडी मिळवले.
कांगांरुचीही खराब सुरुवात
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलिया अ संघाचीही डळमळीत सुरुवात झाली. सॅम कोन्टासला मुकेश कुमारने तंबूत धाडले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला प्रसिद्ध कृष्णाने माघारी धाडले, त्यालाही खाते उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियासाठी खेळलेला मार्क हॅरिस 17 धावा करुन बाद झाला तर वेबस्टरने 33 धावांचे योगदान दिले. यानंतर कर्णधार नॅथन मॅकस्विनी (नाबाद 29) व कॉनोली (नाबाद 14) यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया अ संघाने 39 षटकांत 4 बाद 99 धावा केल्या होत्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा व मुकेश कुमारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
भारत अ संघ पहिला डाव 47.4 षटकांत सर्वबाद 107 (साई सुदर्शन 21, पडिक्कल 36, सैनी 23, डोगेट 15-6, बकिंगहम 2 बळी). ऑस्ट्रेलिया अ 39 षटकांत 4 बाद 99 (हॅरिस 17, मॅकस्विनी खेळत आहे 29, कॉनोली खेळत आहे 14, मुकेश कुमार व कृष्णा प्रत्येकी 2 बळी).