इंडिया ओपनसाठी भारताचे सर्वात मोठे पथक
14 जानेवारीपासून दिल्लीत , जगभरातील बॅडमिंटनपटूंचा सहभाग, लक्ष्य, प्रणॉय, सिंधू, सात्विक-चिराग भारताचे आव्हानवीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
14 जानेवारीपासून येथे सुरू होणाऱ्या योनेक्स सनराईज इंडिया ओपन 750 बॅडमिंटन स्पर्धेत स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन व पीव्ही सिंधू एकेरीत भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील. भारताचे आजवरचे सर्वात मोठे 21 खेळाडूंचे पथक या स्पर्धेत उतरणार आहे.
येथील केडी जाधव इनडोअर हॉल व इंदिरा गांधी स्टेडियमवर या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार असून जगभरातील टॉप स्टार्स यात सहभागी होणार असल्याने अव्वल दर्जाचे सामने पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसेन, अॅन से यंग, जागतिक अग्रमानांकित शि युकी हे अव्वल खेळाडू यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत भारताचे एकूण 21 खेळाडू सहभागी होत असून त्यात पुरुष एकेरीचे तीन, महिला एकेरीत चार, पुरुष दुहेरीत दोन जोड्या, आठ महिला दुहेरीत आणि चार मिश्र दुहेरीच्या जोड्या या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर इव्हेंटमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 950,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. चॅम्पियन ठरणाऱ्या खेळाडूंना 1100 रॅकिंग गुण मिळणार आहेत.
‘या सुपर 750 स्पर्धेत भारताचे मोठे पथक सहभागी होत असल्याने त्यातून या खेळाचा विकास आणि जागतिक स्तरावर भारतीय बॅडमिंटनचा वाढता प्रभाव प्रतिबिंबित होते. ही फक्त सुरुवात असून या नवीन वर्षात प्रस्थापित खेळाडूंबरोबरच अनेक नवीन नावे पुढे आलेली दिसतील, अशी खात्री वाटते. नवे खेळाडू चमक दाखवून उदयास येतील आणि भारताचा निश्चितच गौरव वाढवतील. इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धा होत असल्याने प्रतिभावान भारतीय खेळाडूंची त्यावर सत्त्वपरीक्षाच होणार आहे,’ असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस संजय मिश्रा म्हणाले.
सात्विक-चिरागवर मुख्य भिस्त
2023 पासून या स्पर्धेला सुपर 750 वर्गात सामील केले असून मागील दोन स्पर्धांत भारताने 14 खेळाडू उतरवले होते. त्यातील वैशिष्ट्या म्हणजे मागील वर्षी चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रनकिरे•ाr यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली तर एचएस प्रणॉयने पुरुष एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. चीनमध्ये झालेल्या 2024 चायना मास्टर्स स्पर्धेत सात्विक-चिराग यांनी उपांत्य फेरी गाठली होती. येथील स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ते भारताचे प्रमुख आव्हानवीर व आशास्थान असतील. सात्विक दुखापतीतून बरा झाल्यानंतर पुनरागमन करणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर त्याला फारसे खेळायला मिळाले नसल्याने तो फॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्न करेल.
या दोघांशिवाय भारताच्या आशा माजी विजेता लक्ष्य सेन व दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविलेल्या पीव्ही सिंधू यांच्यावर केंद्रित झाल्या आहेत. या स्पर्धेत जगातील अव्वल 20 पैकी 18 पुरुष एकेरीत आणि 20 पैकी 14 अव्वल महिला बॅडमिंटनपटू एकेरीत खेळताना दिसतील. पुरुष दुहेरीत चीनची पॅरिस ऑलिम्पिक रौप्यविजेती जोडी लियांग वीकेंग व वांग चँग यांच्यासह पॅरिसमध्ये कांस्य जिंकणारी मलेशियाची जोडी आरोन चिया व सोह वूई यिक, डेन्मार्कची जोडी किम अॅस्ट्रप व अँडर्स रासमुसेन, इंडोनेशियाचे फजर अल्फियान व मुहम्मद रियान अर्दियांतो हे प्रमुख खेळाडू असतील.
या स्पर्धेत सहभागी होणारे भारतीय खेळाडू : पुरुष एकेरी-लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत. महिला एकेरी-पीव्ही सिंधू, मालविका बनसोड, अनुपमा उपाध्याय, आकर्षी कश्यप. पुरुष दुहेरी-चिराग शेट्टी-सात्विकसाईराज, के. साई प्रतीक-पृथ्वी के. रॉय. महिला दुहेरी-त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद, अश्विनी पोनप्पा-तनिशा व्रॅस्टो, रुतुपर्णा पांडा-स्वेतपर्णा पांडा, मनसा रावत-गायत्री रावत, अश्विनी भट-शिखा गौतम, साक्षी गेहलावत-अपूर्वा गेहलावत, सानिया सिकंदर-रश्मी गणेश, मृण्मयी देशपांडे-प्रेरणा अलवेकर. मिश्र दुहेरी-ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो, के. सतीश कुमार-आद्या वरियात, रोहन कपूर-जी. रुत्विका शिवानी, अशित सूर्या-अमृता प्रमुथेश.