सर्वात मोठय़ा सागरी युद्धाभ्यासात भारताचा समावेश
एकूण 26 देश सामील होणार : चीनचा प्रभाव मोडून काढण्याची तयारी
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
भारत आणि अमेरिकेसह 26 देश जगातील सर्वात मोठा सागरी युद्धाभ्यास करणरा आहेत. 29 जूनपासून 4 ऑगस्टपर्यंत हा सागरी युद्धाभ्यास चालणार आहे. अमेरिकेच्या होनोलूलू आणि सॅन दियागोमध्ये याकरता तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश दक्षिण चीन समुद्रासह जगातील कुठल्याही सागरी क्षेत्रात एका देशाची अरेरावी चालणार नसल्याचे दाखवून देणे आहे. हा युद्धाभ्यास वर्षात दोन वर्षांमध्ये एकदाच होतो. 2020 मध्ये कोरोना संकटामुळे अखेरच्या क्षणी हा युद्धाभ्यास रद्द करण्यात आला होता. या युद्धाभ्यासाला ‘रिम ऑफ पॅसिफिक एक्सरसाइज 2022’ नाव देण्यात आले आहे. रिमपॅक 1971 मध्ये सुरू झाले होते. यंदा याचे 28 वे आयोजन असणार आहे.
क्वाडचे चारही देश सामील
क्वाडमध्ये सामील चारही देश म्हणजेच भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यात सहभागी होणार आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनसोबत संघर्ष करत असलेले 5 देश देखील यात सामील होतील. यामुळे चीनच्या अरेरावीला रोखण्यासाठी जागतिक समुदाय आता एकत्र येत असल्याचे मानणे चुकीचे ठरणार नाही. अमेरिका या देशांना थेट मदत करत आहे. चीनने अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या सागरी सीमेपासून सुमारे 2 हजार किलोमीटर अंतरावरील सोलोमन आयलँड्सच्या सरकारसोबत एक गुप्त करार केला आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा युद्धाभ्यास महत्त्वाचा ठरत आहे.
अमेरिकेच्या नौदलाची तयारी
अमेरिकेच्या नौदलाच्या थर्ड फ्लीटनुसार 9 देशांचे ग्राउंड कमांडो देखील या युद्धाभ्यासात विशेष स्वरुपात सामील करण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून ग्राउंड ऑपरेशन्सच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र सर्वांसाठी पूर्णपणे खुले रहावे अशी आमची इच्छा आहे. या क्षेत्रात कुणा एकाची मक्तेदारी मान्य केली जाऊ शकत नाही. दक्षिण चीन समुद्र आणि हिंद-प्रशांत महासागरात चीनची अरेरावी सहन केली जाणार नाही. समुद्रावर कुणा एका देशाचा हक्क नसल्याचे चीनने जाणून घ्यावे असे अमेरेकच्या नौदलाकडून म्हटले गेले आहे.
चीनचे टेन्शन वाढणार रिमपॅक 2022 द्वारे चीनला थेट संदेश दिला जाणार आहे. या युद्धाभ्यासात फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि सिंगापूर देखील सामील आहे. या देशांची एकूण सागरी सीमा सुमारे 13 लाख चौरस किलोमीटर आकाराची आहे. क्वाडमध्ये सामील चारही देश आता वेगाने सैन्य सहकार्य वाढवत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी क्वाडला मजबूत करण्यासह तैवानवर दडपण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर कठोर भूमिका घेतली आहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिकेचे सैन्य पाऊल उचलण्यास वेळ लावणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.