जगात उंचावली भारताची प्रतिमा : राष्ट्रपती
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला केले संबोधित : पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना स्वातंत्र्यसेनानींना नमन केले. महात्मा गांधींनी देशाला एकजूट करण्याचे काम केल्याचे म्हणत राष्ट्रपतींनी भगत सिंह, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव यासारख्या स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या बलिदानाचा उल्लेख केला. भारत देश संपूर्ण गौरव प्राप्त करणार आहे. सर्व देशवासीय स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्याची तयारी करत असल्याचे पाहून मला अत्यंत आनंद होतोय. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर असो किंवा राज्याच्या राजधान्यांमध्ये किंवा आमच्या आसपास तिरंगा फडकताना पाहून आमच्या शरीरात उत्साह संचारत असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत. देशात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले आहे.
यंदा आमच्या देशात लोकसभा निवडणूक झाली असून 90 कोटी लोकांनी मतदान केले आहे. मतदानासाठी भीषण उन्हाळ्यात काम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते. भारत 8 टक्के विकासदराने वाटचाल करणारा देश आहे. गरीबीतून बाहेर पडलेले लोक पुन्हा गरीबीत लोटले जाऊ नयेत हे आम्ही सुनिश्चित करत आहोत. अलिकडच्या वर्षांमध्ये पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. सरकारने सेमीकंडक्टर यासारख्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. बँकिंग क्षेत्रात मोठी प्रगती झाली असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.
14 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी देशाने विभाजन विभीषिका स्मृतीदिन पाळला आहे. हा फाळणीच्या भयावहतेचे स्मरण करणारा दिवस आहे. आमचे महान राष्ट्र विभाजित झाले तेव्हा लाखो लोकांना पलायन करणे भाग पडले तर असंख्य लोकांना जीव गमवावा लागला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही या अभूतपूर्व मानवी संकटाचे स्मरण करतो आणि फाळणीत विखुरलेल्या गेलेल्या परिवारांसोबत एकजूट होतो असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
ज्याप्रकारे आम्ही आमच्या परिवारासोबत विविध सण साजरे करतो, त्याचप्रकारे आम्ही आमचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन देखील परिवारासोबत साजरा करत असतो. स्वातंत्र्यसेनानींची स्वप्ने आणि भावी पिढ्यांच्या आकांक्षांना एकत्र गुंफणाऱ्या परंपरेचा आम्ही हिस्सा आहोत. देशवासीय आगामी काळात आमच्या देशाला स्वत:चा संपूर्ण गौरव पुन्हा प्राप्त करताना पाहणार आहेत असे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत. अनेक सरकारी योजनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचे कल्याण केले आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य आणि सुविधा देण्यात आली आहे. सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या असून देशभरात ‘नारी शक्ति’च्या विस्ताराच्या दिशेने काम करत असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.
गगनयान मोहिमेची आतुरतेने प्रतीक्षा
अलिकडच्या वर्षांमध्ये भारताने अंतराळाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. सर्व देशवासीयांसोबत मी देखील पुढील वर्षी होणाऱ्या गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीरांचे पथक अंतराळात पोहोचणार असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले.
भारताची मजबूत भूमिका
जी-20 च्या यशस्वी अध्यक्षत्वानंतर भारताने ग्लोबल साउथचा आवाज म्हणून स्वत:ची भूमिका मजबूत केली आहे. भारत स्वत:च्या प्रभावशाली स्थितीचा उपयोग जागतिक शांतता आणि समृद्धीची कक्षा वाढविण्यासाठी करू इच्छितो असे राष्ट्रपती म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक
आमच्या अन्नदाता शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक राहिल हे सुनिश्चित केले आहे. भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करणे आणि आमच्या लोकांचे पोट भरण्यात शेतकऱ्यांनी अत्यंत मोठे योगदान दिले असल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे.