भारताचे ऐतिहासिक पदक निश्चित
वृत्तसंस्था/गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले ऐतिहासिक पदक निश्चित करताना कोरियाचा पराभव केला. विश्व कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरेल. गुरूवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत यजमान भारताने कोरियाचा 44-45, 45-30, 45-33 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. ही उपांत्यपूर्व फेरीची लढत जवळपास तीन तास चालली होती. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ बलाढ्या इंडोनेशियाबरोबर पडेल. इंडोनेशियाने अलिकडेच 19 वर्षांखालील वयोगटातील आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे. गुवाहाटीतील स्पर्धेत दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इंडोनेशियाने चीन तैपेईचा 45-35, 45-35 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला आता उपांत्य फेरीत एकेरीतील सामन्यावर अधिक भर द्यावा लागेल. कोरियाबरोबर झालेल्या लढतीमध्ये मुलांच्या दुहेरीत भारताच्या भार्गवराम अरिगेला आणि विश्वतेज कोबरु यांना कोरियाच्या वू आणि ली हेयांग यांच्याकडून पहिला सेट 5-9 असा गमवावा लागला होता.