भारताच्या जीएस लक्ष्मी व वृंदा राठी यांची निवड
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सामनाधिकारी व पंचाचे काम पाहणार
वृत्तसंस्था/ दुबई
पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने सामनाधिकारी व पंचांची यादी जाहीर केली असून भारताच्या दोघींना त्यात संधी मिळाली आहे. सामनाधिकारी जीएस लक्ष्मी व पंच वृंदा राठी यांना या यादीत स्थान मिळाले आहे.
स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पॅनेलमध्ये तीन सामनाधिकारी व 10 पंचांचा समावेश आहे. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यातील सामने दुबई व शारजाह येथे खेळविले जातील. भारत व पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या इलोइस शेरिडन व दक्षिण आफ्रिकेच्या एजेनबग यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर विंडीजच्या जॅकेलिन विल्यम्स या टीव्ही पंच असतील. 6 ऑक्टोबर रोजी दुबईत हा सामना होईल.
3 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत असून बांगलादेश व स्कॉटलंड यांच्यात उद्घाटनाचा सामना होईल. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसॅक व एजेनबग पंचांचे काम पाहतील. भारताची सलामीची लढत 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होत असून विल्यम्स व इंग्लंडच्या अॅना हॅरिस मैदानी पंच व पोलोसॅक या टीव्ही पंच असतील. 9 ऑक्टोबर रोजी लंकेविरुद्ध होणाऱ्या भारताच्या सामन्यात न्यूझीलंडच्या किम कॉटन व एजेनबग मैदानी पंच व इंग्लंडच्या सुझान रेडफर्न या टीव्ही पंचाचे काम पाहतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या भारताच्या सामन्यासाठी रेडफर्न व कॉटन आणि विल्यम्स या पंचांचे काम पाहतील.
17 व 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य व 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीसाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची निवड नंतर जाहीर करण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेची ही नववी आवृत्ती असून आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. पण तेथील अस्थिर राजकीय वातावरण व त्यानंतर झालेल्या ंिहंसाचारामुळे आयसीसीने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचे यजमानपद बांगलादेशकडेच राहणार आहे.