भारताचा विकास दर 6.8 राहण्याचे संकेत : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज
अर्थतज्ञ डॅनियल लेह यांची माहिती : जीडीपी दरात सुधारणा
वृत्तसंस्था/ लंडन
आर्थिक वर्ष 2024-25 करिता भारताचाजीडीपी दर हा 6.8 टक्के इतका राहू शकतो, असा सुधारीत अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (आयएमएफ)व्यक्त केला आहे. जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने आर्थिक वर्ष 2025 साठी जो जीडीपी दर जाहीर केला होता त्यामध्ये 0.3 टक्के वाढ होणार असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
भारताची आर्थिक परिस्थिती चांगली असून ती पाहूनच आपण नव्याने सुधारित जीडीपी दर जाहीर केला असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. जागतिक स्तरावरची विविध देशांची स्थिती पाहता त्या तुलनेमध्ये भारताची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी उत्तम दिसून येते आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचे अर्थतज्ञ डॅनियल लेह यांनी मांडले आहे. यावर्षी भारतातील महागाई दर हा 4.6 टक्के राहणार असून पुढील वर्षी तो 4.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. खासगी स्तरावरची वाढती मागणी लक्षात घेता अपेक्षेपेक्षा जास्त विकास भारतामध्ये दिसून येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
विकासदर 6.5 टक्के : संयुक्त राष्ट्राचाही अहवाल
भारतीय अर्थव्यवस्था 2024 मध्ये 6.5 टक्के विकसित राहणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास (युएनसीटीएडी)ने वर्तवला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या पुरवठा साखळीत विविधता आणताना भारत उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत करत विस्तारावर भर देत आहे. ज्यामुळे भारताची निर्यातीप्रती कामगिरी चांगली राहू शकते, असे युएनसीटीएडीने म्हटले आहे. भारत 2023 मध्ये 6.7 टक्के इतका विकसित राहिला होता आणि 2024 मध्ये 6.5 टक्के विकास दर राहील. हा देश इतरांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढणारा देश असेल असेही युएनसीटीएडीने म्हटले आहे.