आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताचा जीडीपी वाढणार
इंडिया रेटिंग्स अॅण्ड रिसर्च अहवालामधून अंदाज व्यक्त
मुंबई :
चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 30 जुलै रोजी 7.1 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सरकारी भांडवली खर्च, कॉर्पोरेट/बँकांच्या ताळेबंदात झालेली घट आणि खासगी कॉर्पोरेट भांडवली खर्चाच्या चक्राची सुरुवात यामुळे सध्या सुरू असलेल्या वाढीच्या गतीला केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाद्वारे पाठिंबा मिळत असल्याचे इंडिया रेटिंग्स यांनी आपल्या अहवालामध्ये सांगितले आहे.
अर्थसंकल्पात कृषी व ग्रामीण खर्चाला चालना देणे, एमएसएमईंना कर्ज वितरण सुधारणे आणि अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले आहे. रेटिंग एजन्सीने आर्थिक 2025 साठी जीडीपी वाढीचा अंदाज सुधारून 7.5 टक्के केला आहे.
जीडीपी वाढीचा अंदाज आरबीआयच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, ज्याने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 7.2 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता आणि वित्त मंत्रालयाच्या आर्थिक सर्वेक्षणाने जीडीपी 6.5 ते 7 टक्के दरम्यान वाढण्याचा अंदाज वर्तवला होता.
अर्थसंकल्पाने कृषी आणि ग्रामीण विकासासाठी चांगली तरतूद केली असून त्याचे सकारात्मक परिणाम पुढील काळात दिसून येतील. तसेच सामान्य मान्सूनपेक्षा चांगला पाऊस आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांद्वारे वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचेही रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.
अन्नधान्य चलनवाढ हा धोका कायम आहे, परंतु किरकोळ चलनवाढ आर्थिक वर्ष 24 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 25 मध्ये सरासरीने मध्यम राहण्याची अपेक्षा आहे, वास्तविक वेतन वाढीला वातावरण पोषक आहे.