भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर
आशियाई विकास बँकेने व्यक्त केले आर्थिक वर्ष 2025 साठी भाकीत
नवी दिल्ली :
आशियाई विकास बँकेने (एडीबी) बुधवारी आर्थिक वर्ष 2025 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकास दराचा अंदाज 7 टक्के ठेवला. औद्योगिक क्षेत्रातील मजबूत वाढ आणि गृहनिर्माण क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन बँकेने हा अंदाज घोषित केला आहे.
एडीबीने म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारची मजबूत आर्थिक स्थिती आर्थिक विकासाला चालना देऊ शकते. तथापि, हवामान बदल आणि भू-राजकीय धक्क्यांमुळे उद्भवणारे धोके देखील लक्षात ठेवले पाहिजेत.
कृषी क्षेत्राची भूमिका आणि सरकारी गुंतवणूक
एडीबीच्या जुलैच्या आउटलुकने म्हटले आहे की भारताचे कृषी क्षेत्र सामान्यपेक्षा चांगल्या मान्सूनच्या अंदाजाने उभारी घेऊ शकते, जे ग्रामीण भागातील आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. तसेच सरकारी खर्चातून गुंतवणुकीची मागणी मजबूत राहिली आहे.
बँक पत आणि निर्यात वाढ
एडीबीने म्हटले आहे की, ‘बँक क्रेडिटमुळे घरांची मजबूत मागणी आणि खासगी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. तथापि, निर्यात वाढीचे नेतृत्व सेवांद्वारे केले जाईल, तर कापड निर्यात तुलनेने कमकुवत वाढ दर्शवेल. एडीबीने असेही म्हटले आहे की सेवांसाठी खरेदी व्यवस्थापक निर्देशांक त्याच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त आहे.
आयएमएफचा जीडीपी वाढीचा दर
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने मंगळवारी आपल्या जागतिक आर्थिक आउटलुकमध्ये अपडेट देताना आर्थिक 2025 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर अंदाज 20 आधार अंकांनी वाढवून 7 टक्के केला आहे. ही वाढ विशेषत: ग्रामीण भागात खासगी वापरात वाढ झाल्यामुळे नव्याने घोषित केली आहे.
आर्थिक वर्ष 2026 साठी, एडीबीने एप्रिल आउटलूकमध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्के स्थिर ठेवला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या तात्पुरत्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपी 8.2 टक्के दराने वाढला आहे.