भारताची जीडीपी वाढ जागतिक अर्थव्यवस्थेसाठी उज्ज्वल बाब
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांचे मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात उज्ज्वल असा आहे, यात तीळमात्र शंका नाही. मला वाटते की अशा प्रकारच्या वातावरणात सहा ते सात टक्के आणि त्याहून अधिक दराने वाढ करणे हे खूपच कौतुकास्पद म्हणायला हवे. हे साध्य करण्यासाठी भारताला खूप सारी सुयोग्य पावले उचलावी लागली आहेत, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी गुरुवारी सांगितले.
पुढील आठवड्यात होणाऱ्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) वार्षिक बैठकीपूर्वी बंगा यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘भारतातील बहुतेक वाढ देशांतर्गत बाजाराच्या बळावर शक्य झाली आहे, जे काही अर्थाने चांगले लक्षण आहे. भारताला ज्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे आणि जसे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांनीही म्हटल्याप्रमाणे... जीवनाचा दर्जा, हवा आणि पाण्याची गुणवत्ता इत्यादींवर काम करणे आवश्यक आहे.’
त्याचवेळी, जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका (ऑपरेशन्स) अॅना जेरडे म्हणाल्या की, बँक सरकारला रोजगार वाढीसोबत शाश्वत विकासावर भर देण्यास मदत करत आहे. भारतामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची अफाट क्षमता असल्याने कामगारांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.