For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत घट

06:13 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत घट
Advertisement

5.4 टक्के जीडीपी, ही घट होण्याची कारणे अनेक

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्याच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) विकासाचा दर घटला असून तो 5.4 टक्के या पातळीवर आहे. हा विकासदर गेल्या सात तिमाहींमधील सर्वात कमी आहे. औद्योगिक उत्पादनात झालेली घट आणि इतर काही कारणांमुळे यावेळी विकासदराची ही स्थिती झाली आहे.

Advertisement

दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटला असला तरी विशेष चिंतेचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातील काही मान्यवरांनी व्यक्त केली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन तिमाहींमध्ये विकास दर वाढून तो अपेक्षित पातळीपर्यंत पोहचेल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादनासमवेत वीज उत्पादन आणि खाण उत्पादनातही दुसऱ्या तिमाहीत घट झाली आहे. या घटकांचा परिणाम एकंदर विकासदरावर झाल्याचे स्पष्ट होत आहे.

कृषीक्षेत्र जोरात

यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाल्याने कृषी क्षेत्राचा विकासदर दमदारपणे वाढणार आहे. तो 3.5 टक्क्यांच्या आसपास असेल अशी माहिती देण्यात आली. दुसऱ्या तिमाहीतील घटीमुळे वर्षभराच्या अपेक्षित विकासदरात फारसे अंतर पडणार नाही. कारण या वर्षीच्या आणखी दोन तिमाहींमध्ये विकास दर 7.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाचा सरासरी विकासदर 7 टक्के या मूळ अपेक्षेच्या पुढे-मागे राहण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या दिवसांमध्ये...

दुसऱ्या तिमाहीत मागणीमध्ये घट दिसून आली आहे. मात्र, सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. याचा सकारात्मक परिणाम पुढच्या तिमाहीच्या विकासदरावर होणे अपेक्षित आहे. रिझर्व्ह बँकेने संपूर्ण वर्षभरासाठीचा विकास दर 7.2 टक्के अपेक्षिलेला आहे. मात्र, उरलेल्या दोन तिमाहींमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. तर वर्षाचा सरासरी विकासदर 6.5 टक्क्यांच्या खाली राहू शकतो, अशीही चिंता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.

जीव्हीए समाधानकारक

सध्याच्या आर्थिक वर्षाचा अर्धा भाग आता संपला आहे. या अर्ध्या भागात वस्तुनिष्ठ जीव्हीए 81 लाख 30 हजार कोटी रुपये इतका होता. जीव्हीए याचा अर्थ उत्पादित वस्तू आणि सेवा यांची एकंदर किंमत असा होतो. 2023-2024 च्या आर्थिक वर्षात तो 76 लाख 54 हजार कोटी इतका होता. त्यामुळे ही वाढ 6.2 टक्के आहे. मात्र ती अपेक्षेपेक्षा काही प्रमाणात कमी आहे.

स्थिर विकासदरात वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर विकासदरात 6.00 टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी स्थिर विकास 82.77 लाख कोटी इतक्या किमतीचा झाला. तो यंदा याच कालावधीत 87.74 लाख कोटी इतका झाला आहे. नॉमिनल जीव्हीएमध्येही वाढ दिसून येत असून 8.9 टक्क्यांची वाढ गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत झाली आहे. गेल्यावर्षी पहिल्या सहामाहीत तो 128.31 लाख कोटी रुपये होता. तर यावर्षी पहिल्या सहामाहीत तो 139.78 लाख कोटी रुपये आहे.

नॉमिनल दरात चांगली वाढ

सध्याच्या वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रियल जीव्हीएपेक्षा नॉमिनल जीव्हीएमध्ये अधिक वाढ दिसून आली. दुसऱ्या तिमाहीत रियल जीव्हीए 40.58 लाख कोटी इतका होता. तर मागच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तो 38.42 लाख कोटी होता. ही वाढ 5.4 टक्के असून ती अपेक्षेपेक्षा जवळपास एक टक्का कमी आहे. नॉमिनल जीव्हीए यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 69.54 लाख कोटी रुपये इतका होता. तो मागच्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 64.35 लाख कोटी रुपये होता. त्यामुळे ही वाढ 8.1 टक्के आहे. तथापि, ही वाढही अपेक्षेपेक्षा कमी आहे, अशी माहिती संख्या विभागाकडून देण्यात आली आहे.

दुसऱ्या तिमाहीत काय घडले...

ड बांधकाम क्षेत्राच्या विकासदरात 7.7 टक्के अशी समाधानकारक वाढ. तर पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीची सरासरी वाढ 9.1 टक्के अशी आहे.

ड टर्शिअरी क्षेत्राचा विकास दर दुसऱ्या तिमाहीत 7.1 टक्के आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीचा याच क्षेत्राचा सरासरी वाढ दर 7.5 टक्के आहे.

ड खासगी खप खर्चाचा वाढदर दुसऱ्या तिमाहीत 6.0 टक्के आहे. हाच दर पहिल्या तिमाहीत 6.7 टक्के होता. सरासरी दर 6.35 टक्के राहिला.

ड सरकारी खप खर्च विकास दर 4.4 टक्के आहे. या दरातही पहिल्या तिमाहीच्या तुलनेत वाढ दिसून आल्याने स्थिती समाधानकारक आहे.

ड कृषी क्षेत्राचा विकास दर दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट अर्थात 3.5 टक्के आहे. त्यामुळे सुधारणा.

ड दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर शेअरबाजारात वाढ झाली आहे. बाजार शुक्रवारी दिवसअखेर 759 अंकांनी वधारला आहे.

ड व्याजदरात वाढ झाल्याने शहरी भागातील मागणी घटल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही तात्कालिक स्थिती असून पुढे मागणी वाढणे शक्य आहे.

Advertisement
Tags :

.