भारताचा आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा टी-20 सामना
हेझलवूडबरोबर ट्रेव्हिस हेडचीही अनुपस्थिती, भारतीय संघाला आघाडी घेण्याची संधी, शुभमन गिलने लयीत येण्याची गरज
वृत्तसंस्था/ कॅरारा (गोल्ड कोस्ट)
आज गुरुवारी येथे होणाऱ्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आत्मविश्वासाने भरलेला भारत धक्का बसलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तीन सामन्यांनंतर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे आणि मागील सामन्यात जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाला 186 धावांचा बचाव करणे कठीण गेले.
आजच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड असणार नाही. कारण हा सलामीवीर अॅशेसच्या तयारीसाठी शेफील्ड शिल्डमध्ये खेळणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचे दोन आधारस्तंभ उपलब्ध नसल्याने गाब्बा येथे होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी 2-1 अशी आघाडी घेऊन मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची भारतासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. गेल्या सामन्यात भारताची संघरचना आणि आठव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न अखेर जाग्यावर पडल्याचे दिसून आले.
तथापि, भारतीय संघ व्यवस्थापनाला थोडीशी अडचण कर्णधार शुभमन गिलच्या मालिकेतील फॉर्ममुळे भासेल. कारण त्याला मागील सहा सामन्यांत अर्धशतक झळकावता आलेले नाही. एकदिवसीय मालिकेच्या सुरुवातीपासूनचा त्याच्या धावांचा क्रम 10, 9, 24, नाबाद 37, 5 आणि 15 असा आहे. तो फक्त कॅनबेरा येथे चांगला सुरात दिसला. तेथे त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत एक छोटीशी भागीदारी केली. गिलला हलक्या स्वींगसह पडणाऱ्या ‘फूलर’ चेंडूंचा त्रास झाला आहे आणि तो खरोखरच त्याच्या नेहमीच्या लयीत दिसलेला नाही.
दुसरीकडे, अभिषेक शर्माने जगातील अव्वल टी-20 फलंदाज म्हणून त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू दिलेली नाही. त्याने मालिकेत एक उत्तम अर्धशतक झळकावलेले आहे आणि दोनदा जलद सुरुवात केली आहे. तथापि, गिलला एका आठवड्याच्या आत कसोटी प्रकाराकडे वळावे लागेल. तो कोणत्याही स्वरुपात खेळत असला, तरी काही धावा जमविता आल्यास त्याला नक्कीच खूप आत्मविश्वास मिळेल. कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात दोन चांगल्या सुरुवातीसह त्याच्या वैशिष्ट्याची काही प्रमाणात झलक दाखवली. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील मालिकेपूर्वी एका महिन्याचा ब्रेक मिळणार असल्याने काही धावाही खात्यात जमा करण्याची त्याची नक्कीच इच्छा असेल. सूर्यकुमार मुंबईचा पुदुचेरीविऊद्धचा रणजी ट्रॉफी सामना खेळेल अशी अपेक्षा आहे.
जरी कुलदीप यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी परत पाठवण्यात आले असले, तरी अर्शदीप सिंगच्या समावेशासह गोलंदाजी विभाग प्रभावी दिसत आहे. संघ व्यवस्थापनाचा मुख्य मुद्दा नेहमीच असा राहिला आहे की, कुलदीप आणि अर्शदीप या दोघांनाही एकत्र खेळवता येणार नाही. जर कुलदीपला पसंती दिली, तर चांगले फलंदाजी कौशल्य असलेल्या हर्षित राणाला संघात स्थान द्यावे लागते, तर जेव्हा अर्शदीप खेळतो तेव्हा कसे तरी वॉशिंग्टन सुंदरला संघात घ्यावे लागते. वॉशिंग्टनने 23 चेंडूंत 49 धावा काढल्याने तिसरा सामना भारताच्या बाजूने गेला.
दुसरीकडे, फलंदाजीमध्ये आक्रमक कामगिरीसाठी ऑस्ट्रेलियन संघ कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिडवर बराच अवलंबून असेल. संघात हेड नसल्याने मार्शचा सलामीवीर म्हणून मॅथ्यू शॉर्ट येऊ शकतो. तथापि, गोलंदाजी विभागात ऑस्ट्रेलियाला काही बदल करावे लागतील. कारण शॉन अॅबॉट निश्चितच आपली भूमिका योग्यरीत्या बजावताना दिसलेला नाही आणि त्याच्या जागी बेन द्वारशुइस किंवा माहली बियर्डमन यांच्यापैकी एकट्याची वर्णी लागू शकते.
संघ-भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीशकुमार रे•ाr, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वऊण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, जोश फिलिप, मिचेल ओवेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट कुहनेमन, अॅडम झॅम्पा, महली बियर्डमन, बेन ड्वार्शुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मार्कस स्टॉइनिस.
सामन्याची वेळ : दुपारी 1.45 वा.