पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पदकांचा चौकार,अवनी लेखराचा नेमबाजीत सुवर्णवेध
मोना अगरवालला कांस्य,10 मी एअर पिस्तूलमध्ये मनीष नरवालला रौप्य,100 मी शर्यतीत प्रीती पालला कांस्य
वृत्तसंस्था/पॅरिस
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दणक्यात सुरुवात करताना स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण आणि कांस्यपदकासह पदकांचे खाते उघडले आहे. स्टार पॅरा नेमबाज अवनी लेखराने भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. तिने 10 मीटर एअर रायफल (एसएच1) अंतिम स्पर्धेत पदक जिंकले. तर मोना अगरवालने कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, अवनीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे, याआधी तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते. या शानदार कामगिरीसह पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. याशिवाय, पुरुष नेमबाज मनीष नरवालने रौप्य तर महिलांच्या 100 मी शर्यतीत प्रीती पालने कांस्यपदकाची कमाई केली. यासह पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकसंख्या चार झाली आहे.
सुवर्णपदकासह भारताने पदकांचे खाते उघडले
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (एसएच1) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत भारताच्या मोना अगरवालने कांस्यपदक जिंकले. या दोन पदकांसह पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पदकांचे खाते उघडले. दरम्यान, अवनी व मोना या दोघींना आणखी पदके जिंकण्याची संधी आहे. या दोघीही मिश्र 10 मी एअर रायफल प्रोन (एसएच1) व महिलांच्या 50 मी रायफल 3 पोझिशन प्रकारात सहभागी होणार आहेत.
सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी अवनी लेखरा पहिली भारतीय
अवनी लेखरा राजस्थानमधील जयपूरची रहिवासी आहे. 2012 साली एका गंभीर कार अपघातामध्ये ती जखमी झाली होती. यानंतर तिच्या कंबरेखालील भागाने काम करणे बंद केले होते, पण तरीही तिने हार मानली नाही. अभिनव बिंद्राला आदर्श मानत तिने नेमबाजीचा सराव केला व वयाच्या 19 व्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत तिने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक तर 50 मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. यानंतर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत विक्रमी कामगिरी केली आहे. ती आता सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला अॅथलीट ठरली आहे.
14.21 सेकंदात 100 मीटर, भारताच्या प्रीती पालची अफलातून कामगिरी
प्रीती पालने अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. पदक जिंकण्यासोबतच प्रीतीने इतिहासही घडवला आहे. तिने महिलांच्या 100 मीटर टी35 स्पर्धेत 14.21 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. चीनच्या जिया (13.35 सेकंद) आणि गुओ यांनी 13.74 सेकंदात शर्यत पूर्ण करुन सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. 23 वर्षीय प्रीती प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. 100 मी शर्यतीत यश मिळवल्यानंतर आता ती 200 मीटर स्पर्धेतही भाग घेणार आहे. यंदाच्या वर्षी दमदार फॉर्ममध्ये असलेल्या प्रीतीने धमाकेदार कामगिरी साकारली आहे. आता पॅरालिम्पिकमध्ये यश मिळवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
10 मी एअर पिस्तूल प्रकारात मनीष नरवालला रौप्य
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला नेमबाज अवनी लेखरा व मोना अगरवाल यांनी पदक जिंकल्यानंतर थोड्याच कालावधीत पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल प्रकारात (एसएच1) मनीष नरवालने रौप्यपदक जिंकले. मनीषने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिसमधील स्पर्धेत मात्र त्याचे सुवर्णपदक 2.5 गुणांच्या फरकाने हुकले. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या जो जोंगडूने सुवर्णपदक तर चीनच्या यांग चाओने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत मनीष व कोरियन जोंगडू यांच्यात चांगलीच टक्कर पहायला मिळाली. मनीष काही काळ आघाडीवर होता पण खराब शॉटमुळे तो मागे पडला. कोरियन जोंगडूने 237.4 गुणासह सुवर्ण तर मनीषने 234.9 गुणासह रौप्यपदक पटकावले. बालपणापासून उजव्या हाताची समस्या असलेल्या मनीषला बरे करण्यासाठी कुटुंबियांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. आई वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर मनीषने नेमबाजीला सुरुवात केली व त्यात यश मिळवले. टोकियोपाठोपाठ पॅरिस पॅरालिम्पिकमध्येही त्याने पदक जिंकण्याची किमया केली आहे.