भारताची आज अफगाणिस्तानशी लढत
वृत्तसंस्था/ ब्रिजटाउन (बार्बाडोस)
टी-20 विश्वचषकातील आज गुरुवारी येथे होणार असलेल्या लढतीत विजेतेपदाचा दावेदार भारताला सुपर एटमधील त्यांची मोहीम सुरू करताना अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात विराट कोहली आपली खराब कामगिरी संपवून पुन्हा सुरात येईल अशी अपेक्षा असेल. त्याशिवाय डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आपल्याला संधी मिळण्याची आशा बाळगून असेल.
भारतीय संघरचना हा मोठा चर्चेचा मुद्दा असून गट स्तरावर यश मिळवून दिलेली संघरचना भारत कायम ठेवेल की, वेगवान गोलंदाजाला वगळून कुलदीपला आणेल याची उत्सुकता लागून राहिली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे चारही अष्टपैलू खेळाडू संघात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही रणनीती न्यूयॉर्कमधील गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत चालली आणि रोहित आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीला विस्तारणारी ही रचना कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.
कुलदीपला संघात बसविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोहम्मद सिराज किंवा अर्शदीप सिंगला वगळणे. तसे झाल्यास सिराजला डच्चू मिळण्याची जास्त शक्यता आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल राहील असे संकेत मिळत असून त्यामुळे कुलदीपची स्थिती अधिक मजबूत बनण्याची शक्यता आहे. मात्र केन्सिंग्टन ओव्हलवर मंद वाऱ्याची झुळूक वाहत असते. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये चेंडू स्विंग करण्याची संधी मिळू शकते.
या समन्यात सर्वांच्या नजरा कोहलीवर असतील. त्याला अद्याप स्पर्धेत दोन अंकी धावसंख्या नोंदवता आलेली नाही. फटकेबाजीवर भर देण्याच्या त्याच्या रणनीतीचे न्यूयॉर्कमध्ये अपेक्षित परिणाम मिळू शकलेले नाहीत. परंतु कॅरिबियनमधील चांगल्या खेळपट्ट्यांवर त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होण्याची अपेक्षा आहे. मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये षटकार खेचण्यासाठी संघात आणलेल्या शिवम दुबेने या स्पर्धेत फक्त एकदाच चेंडू पार्कच्या बाहेर पाठवलेला आहे. अमेरिकेतील खेळपट्ट्यांनी त्याला फिरकीपटूंवर हल्ला करू दिले नाही. ‘सुपर 8 आणि त्यापुढील प्रवासात तो बदलेल अशी अपेक्षा आहे.
भारताचा प्रमुख टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव नेहमीच्या शैलीत दिसलेला नसला, तरी अमेरिकेविरुद्ध केलेल्या धावा त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेशा आहेत. कोहलीव्यतिरिक्त हार्दिक पंड्याच्या बॅटमधून धावा बरसणे बाकी आहे. गोलंदाजीत मात्र त्याने चमक दाखविलेली आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहला अर्शदीप सिंगने चांगली साथ दिलेली आहे. खेळपट्टी संथ गोलंदाजीला मदत करण्याची शक्यता असल्यामुळे अक्षर आणि जडेजा प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक असतील.
दुसरीकडे, अफगाणिस्तानला सेंट लुसिया येथे वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारून सुपर एटमध्ये प्रवेश करावा लागलेला आहे. ते पॉवरप्लेमध्ये बळी मिळवून देत आलेला डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फाऊकीवर खूप अवलंबून असतील. त्याने आतापर्यंत जसा चेंडू स्विंग केलेला आहे तशी गोलंदाजी तो आज करू शकला, तर रोहित आणि कोहलीला सावध राहावे लागेल. रशिद खानही मधल्या षटकांमध्ये बळी मिळविण्यास उत्सुक असेल. फलंदाजीच्या आघाडीवर फॉर्मात असलेले सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान हे संघासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचे ठरतील.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान : रशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फाऊकी, हजरतुल्ला झझाई, फरीद अहमद मलिक, मोहम्मद इशाक, नांगेयालिया खारोटे.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)