For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुद्री शौर्यातही भारताचा लौकिक

06:26 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
समुद्री शौर्यातही भारताचा लौकिक
Advertisement

‘विश्वमित्र’ मोहिमेद्वारे शत्रूराष्ट्रांनाही मदत, भारतीय नौदलाकडून वेळोवेळी बचावकार्य

Advertisement

कोरोनासारखे मोठे जागतिक वैद्यकीय संकट असो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असो... भारताने वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगावर महासंकट ओढवले असताना भारतनिर्मित लस, वैद्यकीय उपकरणे आणि अन्नधान्याचा पुरवठा भारताकडून नि:स्वार्थीपणे करण्यात आला. त्याचबरोबर अलिकडेच झालेल्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धादरम्यान भारताने आपल्या नागरिकांबरोबरच विविध देशांच्या लोकांना वाचविण्यात मदत केल्याचे सर्वश्रुत आहे. बचाव व मदतकार्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. अशाच पद्धतीची सध्या चर्चेत असलेली मोहीम म्हणजे ‘विश्वमित्र मोहीम’! या मोहिमेच्या माध्यमातून भारताने समुद्री चाच्यांविऊद्ध ‘ऑपरेशन’ राबवत अनेकांना वाचविण्याबरोबरच कोट्यावधींचा माल सुरक्षित ठेवण्याची किमया केली आहे. नुकतीच इराण-इस्रायल यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली असतानाही हायजॅक केलेल्या जहाजातील क्रू मेंबर्सना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाने धाव घेतली आहे. आतापर्यंतच्या अशा विविध मोहिमांमधून भारताने समुद्रातही दबदबा तयार करत आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक वाढवला आहे.

भारत... सदैव तत्पर!

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रसंगी भारताचा ‘विश्वमित्र’ असा उल्लेख केला आहे. संपूर्ण जगात भारताने एक जागतिक मित्र म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. अनेक देश भारताकडे एक मित्र म्हणून पाहत आहेत. जे देश एकेकाळी भारतापासून दूर होते ते आता भारताचे मित्र बनू लागले आहेत. बदलत्या काळानुसार भारताने वेळोवेळी भूमिका बदलत इतरांना मदत केली आहे. भारताची ही ताकद जगाने एकदा नाही, तर अनेकवेळा पाहिल्यामुळेच कोणालाही, कुठेही भारताच्या मदतीची आवश्यकता असल्यास भारत सदैव तत्पर असल्याचे दिसते.

मदत कशी मागितली जाते?

गेल्या काही महिन्यात भारतीय नौदलाने अनेक देशांच्या नागरिकांना सागरी हल्ल्यातून वाचविले आहे. एखाद्या देशाच्या जहाजावर समुद्रात हल्ला झाल्यास इतर देशांच्या नौदलाची मदत मागितली जाते. विविध देशांचे नौदल आपापल्या पाणबुड्यांसह समुद्रात तैनात असते. भारताचाच विचार केल्यास अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात भारतीय नौदल तैनात आहे. येथून भारतीय नौसैनिक केवळ शत्रूंवर लक्ष ठेवत नाहीत तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतही करतात. एखाद्या व्यापारी जहाजावर किंवा इतर कोणत्याही जहाजावर समुद्री चाच्यांनी किंवा इतर कोणत्याही शत्रूने हल्ला केल्यास नौदल माहिती मिळताच मदत पाठवते. या मोहिमेत सहभागी असलेली जहाजे एका विशेष प्रकारच्या

संप्रेषण प्रणालीसह सुसज्ज असतात. त्यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत, मदतीसाठी जवळच्या जहाजांना सिग्नल पाठविले जाऊ शकतात. या सिग्नल्सद्वारे एका देशाचे नौदल दुसऱ्या देशाच्या जहाजांना वाचवण्यासाठी पोहोचते.

शत्रूराष्ट्रासाठीही धाव...

अलिकडेच पुन्हा एकदा भारताने समुद्रात शौर्य दाखवत भारताविऊद्ध कट रचणाऱ्या आणि मुख्य शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांना वाचविले होते. मार्च महिन्याच्या अखेरीस भारतीय नौदलाने सोमालियाच्या समुद्री चाच्यांविऊद्ध कारवाई करून 23 पाकिस्तानी नागरिकांचे प्राण वाचविले. हे सर्व पाकिस्तानी नागरिक ‘अल कंबार 786’ या इराणी जहाजावर कर्तव्यावर असताना नऊ सशस्त्र समुद्री चाच्यांनी सोकोत्राजवळ इराणी जहाज ताब्यात घेतले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने ऑपरेशन सुरू करत 12 तासांच्या कारवाईनंतर सर्व 9 समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. या मोहिमेद्वारे सर्व 23 पाकिस्तानींची सुखरुप सुटका करण्यात आली.

नौदल चाच्यांचा सामना...

भारतीय नौदल आपल्या युद्धनौकांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रातील इतर देशांच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी अनेक पद्धती वापरते. भारतीय नौदलाने सागरी हल्ल्यांच्या धोक्मयांचा सामना करण्यासाठी अरबी समुद्रात अनेक मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रक्षेपक तैनात केले आहेत. या शिवाय नौदल ड्रोन आणि विमानांच्या सहाय्याने सागरी क्षेत्रातील जहाजांवर लक्ष ठेवते आणि गरज पडल्यास त्यांना वाचविण्याची कारवाई करते. भारतीय नौदलाकडे शक्तिशाली पाणबुड्या असून त्या समुद्राखालून हल्ला करू शकतात. भारतीय नौदलाने सागरी क्षेत्रात आपली ताकद वाढवली असून इतर देशांच्या जहाजांचे विविध प्रकारे संरक्षण केले आहे.

जगासमोर आदर्श...

सोमालियाच्या समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतलेले जहाज येमेनमधील सोकोत्रा बेटाच्या नैऋत्येला सुमारे 166 किलोमीटर अंतरावर होते. अपहरणाची माहिती मिळताच भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस सुमेधा इराणी जहाजाला रोखण्यासाठी पाठवली. त्यानंतर गाइडेड मिसाईल फ्रिगेट आयएनएस त्रिशूलने त्यांना या ऑपरेशनमध्ये मदत केली. या कारवाईत जहाजावर पाकिस्तानी नागरिक असल्याचे भारताच्या लक्षात आले. तरीही भारतीय नौदलाने त्यांचे प्राण वाचविणे हे आपले पहिले कर्तव्य मानले. ही मोहीम अवघ्या काही तासांमध्ये यशस्वीपणे पूर्ण करत जगासमोर एक ‘आदर्श’ घालून दिला.

धोक्याची क्षेत्रे...

खरंतर जगात असे अनेक सागरी मार्ग आहेत, जे मोठ्या देशांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. यामध्ये सोमालिया पहिल्या क्रमांकावर आहे. अलिकडच्या काळात जगभरातील विविध सागरी मार्गांवर चाच्यांनी मोठ्या प्रमाणात जहाजांचे अपहरण केले आहे. सोमालियाच्या 1,800 मैल लांबीच्या सागरी मार्गावरून जात असताना समुद्री चाच्यांनी परदेशी जहाजांवर हल्ला करून त्यांचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकार घडले आहेत.

हिंदी महासागरावर वसलेला टांझानिया हादेखील महत्वाच्या जलमार्गांपैकी एक असून येथेही समुद्री चाच्यांनी मोठ्या प्रमाणात जहाजे लुटली आहेत. नायजेरियातही समुद्री चाच्यांची दहशत आहे. जगातील सर्व चाचेगिरीच्या घटनांपैकी 20 टक्के या भागात घडतात. एडनचे आखातदेखील समुद्री चाच्यांचे

प्रभावी क्षेत्र आहे. तसेच लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडणाऱ्या सुएझ कालव्यावरही चाच्यांची दहशत आहे.

नौदलाचे ‘ऑपरेशन संकल्प’...

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात राबविलेल्या मोहिमेला ‘ऑपरेशन संकल्प’ असे नाव दिले आहे. एडनचे आखात, त्याच्या आजुबाजूचा अरबी समुद्राचा परिसर आणि सोमालियन किनारपट्टीवर ही मोहीम राबविली जाते. हा भाग अनेक दिवसांपासून हुथी बंडखोर आणि सोमालियन चाच्यांच्या दहशतीखाली आहे. ही दहशत संपविण्यासाठी भारतीय नौदल सदैव अलर्ट मोडवर असते.

या मोहिमेद्वारे आतापर्यंत 110 हून अधिक परदेशी नागरिकांचे प्राण वाचले आहेत. ऑपरेशन संकल्प आणि इतर मोहिमांमध्ये भारतीय नौदलाने आतापर्यंत एकंदर 133 लोकांचे प्राण वाचविले. यामध्ये 62 पाकिस्तानी आणि 30 इराणी नागरिकांचा समावेश आहे. गेल्या 100 दिवसात भारतीय नौदलाने समुद्रात घडलेल्या 18 घटनांवर कारवाई केली आहे.

भारतीय नौदलाने ऑपरेशन संकल्प यशस्वी करण्यासाठी समुद्रात 5,000 हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. तसेच 21 ते 22 जहाजे सदैव तत्पर ठेवली आहेत. या काळात भारतीय लढाऊ विमानांनी 900 तास उ•ाण केले आहे. भारताच्या या कारवाईने समुद्री चाच्यांनाही आता धडकी भरल्यावाचून राहणार नाही.Pakistan's encouragement of cross-border terrorism

भारताची किमया...

समुद्रात भारतीय नौदलाचे शौर्य आता संपूर्ण जग पाहत आहे. अरबी समुद्र आणि लाल समुद्र हे समुद्री चाच्यांचे आवडते क्षेत्र आहेत. या भागातून जाणाऱ्या मोठ्या जहाजांचे अपहरण करणे त्यांच्यासाठी सोपे आहे. पण अलिकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. ही परिस्थिती बदलण्यात भारतीय नौदलाची सर्वात मोठी भूमिका आहे. भारत इतर देशांतील लोकांचे प्राण वाचवत आहे.

समुद्री चाच्यांचा वरचष्मा रोखण्याची किमया फक्त जगाचा मित्र भारतच करू शकतो. बदलत्या भारताच्या वाढत्या शक्तीचे हे चित्र आहे. पायरसी ही जागतिक समस्या बनत चालली आहे. कारण जगभरातील देशांची जहाजे फक्त सागरी मार्गानेच जातात. पण भारताने समुद्रात अवलंबलेली रणनीती मोठ्या देशांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

जागतिक पातळीवर सध्याची भारताची ओळख अनन्यसाधारण आहे. चीन, अमेरिका आणि युरोपियन देशांपेक्षा भारताची भूमिका वेगळी आहे. भारताकडून मैत्री, सहकार्य आणि परस्पर फायद्याचा विचार नेहमीच केला जातो. मजबूत अर्थव्यवस्था, यशस्वी मुत्सद्देगिरी, शूर सैन्यबळ आणि उगवती शक्ती यामुळे जग आता भारताकडे एक नवीन शक्ती म्हणून पाहत आहे.

‘भारत केवळ मदतीसाठी इतर देशांतील लोकांचे प्राण वाचवत नाही... तर हे बदलत्या भारताचे चित्र आहे. कोणी अडकले तर आपण त्याला आपले मानून मदत करतो. भारत आता समुद्रातही आपली ताकद दाखवत आहे.’     - एस जयशंकर, परराष्ट्र व्यवहारमंत्री

-जयनारायण गवस

Advertisement
Tags :

.