कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा अंगार, पाकिस्तानी शहरांवर भडिमार

07:10 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाहोरची सुरक्षा व्यवस्था उद्ध्वस्त : रावळपिंडी स्टेडियम नष्ट, अचूक ड्रोन हल्ल्याने दाणादाण

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

पहलगाम येथील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भारताच्या सीमावर्ती राज्यांमधील 15 शहरांच्या दिशेने पाकिस्तानने ड्रोन्स डागण्याचा प्रयत्न केला. तथापि, ही सर्व ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे भारताच्या सुरक्षा यंत्रणेने हवेतच उडवून टाकून पाकिस्तानच्या पदरात पुन्हा अपयश घातले. इतकेच नव्हे, पाकिस्तानच्या या फसलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर अचूक ड्रोन हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तसाठी महत्वाची असणारी लाहोर, कराची, रावळपिंडी इत्यादी शहरांमध्ये अतोनात हानी झाली आहे. लोहार शहराची वायुसुरक्षा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून रावळपिंडी येथील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमची मोठी हानी झाली आहे. कराची येथेही मोठे धमाके झाले आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’ भारताने यशस्वी केल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी न संपल्याने त्याने भारताच्या पंधरा शहरांना लक्ष्य करुन प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याच्याच अंगाशी आला. पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन आणि क्षेपणास्त्र भारताने पडण्याआधीच नष्ट केले. यासाठी रशियाकडून नुकतीच घेतलेली एस-400 ही संरक्षण आणि आक्रमण प्रणाली भारताने उपयोगात आणली. त्यानंतर खवळलेल्या भारतीय सैन्यदलांनी सरळ पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांमधील लष्करी आस्थापनांवरच हल्ला चढविला. यासाठी इस्रायलकडून घेतलेली अत्याधुनिक ड्रोन्स उपयोगात आणली गेली. या महाविनाशकारी ड्रोन्समुळे पाकिस्तानातील महत्वाच्या शहरांची प्रचंड हानी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाहोरला केले लक्ष्य

भारताच्या पंजाब सीमेपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असणारे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्वात महत्वाचे शहर असणाऱ्या लाहोरला भारताने लक्ष्य केले आहे. लाहोर शहराची विशेष वायु संरक्षण व्यवस्था आणि रडार व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आहे. रडार आणि वायुसुरक्षा व्यवस्थेचा अचूक वेध घेऊन ती नष्ट करणारी ड्रोन्स भारताने उपयोगात आणली आहेत. लाहोरच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने पाकिस्तानची चिंता प्रचंड वाढली आहे.

पाठोपाठ ‘जल’हल्ला

झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी भारताने गेले काही दिवस अडवले आहे. तथापि, गुरुवारी अचानक पाकिस्तानच्या ध्यानीमनी नसताना भारताने हे पाणी मोकळे सोडल्यामुळे पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन मोठीच पळापळ झाली. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पाठोपाठ हे जलआक्रमण भारताने पाकिस्तानवर केल्याने ‘त्राहि भगवान’ असे म्हणायची वेळ पाकिस्तानवर आल्याचे वृत्त आहे. हा संघर्ष आणि काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

जवळजवळ युद्धाचाच प्रारंभ

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने प्रतिहल्ला करण्याची चूक केल्याने आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जवळपास युद्धाचाच प्रारंभ झाल्याचे पहावयास मिळत आहे. याची जाणीव असल्यानेच भारताने बुधवारी रात्री महत्वाच्या 244 स्थानांमध्ये सुरक्षा सराव अभियान चालविले होते. या अभियानाअंतर्गत लोकांना वायुहल्ल्याच्या स्थितीत स्वत:ची सुरक्षा कशी करायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अनेक शहरांमध्ये काही मिनिटे ब्लॅकआऊट करण्यात आला होता. दिल्लीतील काही भागांमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट करण्यात आला. वायुहल्ल्याच्या स्थितीत लोकांनी आणि प्रशासनाने नेमके काय करायचे, याची प्रात्यक्षिके टीव्हीवरूनही दाखविण्यात येऊन लोकांना प्रशिक्षित करण्यात आले.

एवॅक्स यंत्रणा सजग

पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्याचा प्रयत्नांचा धुव्वा उडविताना भारताने वायुसंरक्षण रडार, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग व्यवस्था आणि अन्य स्वदेशनिर्मित रडार आणि वायुसंरक्षण व्यवस्थेचा उपयोग करण्यात आला. पाकिस्तानचा प्रतिहल्ला मोडून काढण्यात भारताला शंभर टक्के यश आल्याने पाकिस्तान हताश झाला.

सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

बुधवारच्या ऑपरेशन सिंदूर संबंधी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बहुतेक सर्व पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. सिंदूर अभियान अद्याप संपलेले नसून त्याची कार्यवाही अद्यापही होत आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत दिली. तसेच बुधवारच्या घटनांचे विवेचन केले. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांची आणि ते प्रयत्न निकामी केले गेल्याची माहितीही या बैठकीत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या कोणत्याही कृतीला पूर्ण समर्थन असल्याचा पुनरुच्चार केला.

तणाव वाढविण्याची नाही इच्छा...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जवळपास युद्धसदृश संघर्ष भडकला असताना भारताचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि संरक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेचे आयोजन गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता केले होते. परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी गुरुवारच्या घटनांचा आढावा घेतला. भारताच्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही तणाव वाढवू इच्छित नाही. तथापि, पाकिस्तानने कोणतीही कुरापत काढल्यास आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पाकिस्तानच उत्तरदायी असेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

कोणत्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न

जम्मू, पठाणकोट, अवंतीपुरा, श्रीनगर, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलोदी, उत्तरलयी आणि भूज या शहरांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या शहरांपैकी जम्मू, श्रीनगर, नाल आणि अवंतीपुरा ही शहरे जम्मू-काश्मीरमधील आहेत. तर भूज हे गुजरातमधील आहे. सर्वाधिक सात शहरे पंजाबमधील असून त्यांची नावे अमृतसर, कपूरथला, जालंदर, लुधियाना, आदमपूर, आणि भटिंडा अशी आहेत. चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे. तर फलोदी आणि उत्तरलयी ही शहरे राजस्थानातील आहेत, असे स्पष्ट केले गेले. मात्र, या हल्ल्याच्या प्रयत्नात या शहरांमध्ये काहीही हानी झाली नाही.

बुधवारपेक्षाही मोठा हल्ला

गुरुवारी पाकिस्तानने पुन्हा दु:साहस केल्यानंतर भारताने जो हल्ला चढविला, तो बुधवारच्या हल्ल्यापेक्षाही मोठा आणि विनाशकारी होता, असे काही माजी सेनाधिकाऱ्यांचे मत आहे. कारण बुधवारच्या हल्ल्यात केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, गुरुवारच्या हल्ल्यात पाकिस्तानाच्या आर्थिक नाड्या असणाऱ्या महत्वाच्या शहरांमधील लष्करी आणि रडार आस्थापनांनाच लक्ष केले गेले. त्यामुळे भारताने आपल्या प्रत्युत्तराची व्याप्ती वाढविल्याचे दिसून आले.

गुरुद्वारांवर हल्ला करण्याचा उद्दामपणा

धर्मांध पाकिस्तानी लष्कराने गुरवारी पंजाबमधील काही महत्वाच्या गुरुद्वारांवरही हल्ला करण्याचा असफल प्रयत्न केला आहे. गुरुद्वारा ही शीखांची पवित्र स्थाने आहेत. त्यांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला असून सर्व गुरुद्वारा पूर्णत: सुरक्षित आहेत, अशी माहिती विदेश विभागाने दिली. पाकिस्तान जाणून बुजून भारतीयांच्या धार्मिक भावना भडकाविण्याचा प्रयत्न करीत असून तो त्याच्याच अंगलट येणार आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

चीनची रडार यंत्रणा निकामी

चीनने पाकिस्तानला दिलेली ‘एचक्यू 9’ ही रडार यंत्रणा कुचकामाची असल्याचे या दोन दिवसांमधील घटनांनी सिद्ध केले आहे. लाहोरच्या संरक्षणासाठी पाकिस्ताने ही यंत्रणा प्रस्थापित केली होती. तथापि, भारताच्या ड्रोन्सनी या रडार यंत्रणेचाच भेद केल्याने, एकतर ही यंत्रणा कमजोर आहे किंवा पाकिस्तानकडे तिचा उपयोग करण्याचे कौशल्य नाही, हे सिद्ध झाल्याची चर्चा संरक्षण वर्तुळात होत आहे.

‘हारोप’ने घडविला विनाश

लाहोरच्या वायुसुरक्षा व्यवस्थेला उद्ध्वस्त करताना भारताने इस्रायल आणि भारत यांनी संयुक्तरित्या निर्मिलेली ‘हारोप’ ही विनाशकारी ड्रोन्स उपयोगात आणली आहेत. ही लॉएटरिंग श्रेणीतील ड्रोन्स आहेत. त्यांना कामिकेज असेही म्हणतात. ही ड्रोन्स आत्मघाती प्रकारची असून त्यांच्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांचे मिश्रण असते. ही ड्रेन्स आकाशात तरंगत राहतात आणि लक्ष्य दृष्टिपथात येताच अतिवेगाने त्यांच्यावर आदळून लक्ष्याचा खात्मा करतात. इस्रायल आपल्या शत्रूंच्या विरोधात याच घातक शस्त्राचा उपयोग करतो, अशी माहिती आहे.

हारोपची वैशिष्ट्यो आकड्यांमध्ये...

‘सुदर्शक चक्रा’समोर पाकिस्तान शरण

रशियाकडून नुकत्याच घेतलेल्या एस-400 या प्रणालीमुळे भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न उद्ध्वस्त केला आहे. या व्यवस्थेतून एकाचवेळी 72 क्षेपणास्त्रे शत्रूच्या विमानांवर, ड्रोन्सवर किंवा क्षेपणास्त्रांवर सोडली जातात. त्यामुळे शत्रूच्या साधनांचा आकाशातच स्फोट होऊन त्यांचा नाश होतो. भारताने या यंत्रणेला ‘सुदर्शन चक्र’ हे सार्थ नाव दिले आहे. भारताच्या या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची क्षेपणास्त्र यंत्रणा अक्षरश: चक्रावून गेल्याचे दिसून आले आहे.

लाहोरवरील हल्ल्याचे सामरिक महत्व

पाकिस्तानचा शेअरबाजार धाराशायी

भारताच्या धडाक्याचा तडाखा पाकिस्तानच्या शेअरबाजारालाही बसला असून बुधवारी तो 3,500 अंकांनी तर गुरुवारी 6 हजारांहून अधिक अंकांनी कोसळला आहे. यामुळे पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. भारताचा शेअरबाजार मात्र आपला समतोल राखून भारताचा पराक्रम पहात आहे.

पंतप्रधान मोदी-भूसेना प्रमुख भेट

गुरुवारच्या महत्वपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारताचे भूसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी विस्तृत चर्चा केली आहे. या संघर्षात अद्याप भारताची भूसेना आणि नौसेना यांचा सहभाग त्या मानाने मर्यादित आहे. तथापि, संघर्ष वाढल्यास आणि त्याने युद्धाचे स्वरुप धारण केल्यास या दोन्ही दलांना महत्वाची भूमिका साकारावी लागणार आहे. कदाचित या बिंदूवरच चर्चा करण्यासाठी त्यांची भेट झाली असावी, असे अनुमान व्यक्त करण्यात येत आहे.

सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार

भारताशी दोन हात करण्यात अपयश आल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आता आपला राग सीमावर्ती भागांमधील सर्वसामान्य नागरिकांवर काढण्यास प्रारंभ केला आहे. बुधवारी आणि गुरुवारी पाक रेंजर्सनी नागरी वस्त्यांवर केलेल्या गोळीबारात 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यात चार बालके आणि तीन महिलांचा समावेश आहे. तथापि, भारतानेही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी चौक्यांवर गन्स, उखळी तोफा आणि लहान शस्त्रांचा भडिमार चालविला असून पाकिस्तानचीही मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे 24 सैनिक गतप्राण झाले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article