कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत : ट्रंप

07:00 AM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधानावरुन भाजप-काँग्रेस यांच्यात जोरदार वाद, भारतावर दबाव आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे तज्ञांचे म्हणणे

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी

Advertisement

भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे, अशा अर्थाचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. त्यांनी बुधवारी भारतातून अमेरिकेत येणाऱ्या मालावर 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी भारताच्या धोरणांवर टीका केली. भारतात अमेरिकेच्या वस्तूंवर प्रचंड प्रमाणात कर लावला जातो. त्यामुळे अमेरिकेची हानी होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी त्यांनी भारत आणि रशिया यांच्या आर्थिक आणि सामरिक संबंधांवर टिप्पणी केली. भारताने रशियाशी संबंध कसे ठेवावेत, याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. दोन्ही देशांना त्यांच्या मृतावस्थेतील अर्थव्यवस्था एकमेकांच्या समवेत बुडवायच्या असतील तर ते तसे करु देत, अशी भाषा त्यांनी केली आहे.

त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद भारतात उमटत आहेत. भारत ही मृत अर्थव्यवस्था नाही. भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आज जगात भारताच्या आर्थिक विकासाचा दर सर्वाधिक आहे. अशा अर्थव्यवस्थेसंबंधी ती मृतावस्थेत असल्याची टिप्पणी करणे, अयोग्य असल्याचे मत उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. ट्रंप यांच्या विधानांचा अर्थ आणि त्यांचा परिणाम यांचा विचार केला जात असून भारतासाठी आपले शेतकरी, कामगार, लघु आणि मध्यम उद्योग यांचे हित सर्वतोपरी आहे, अशी प्रतिक्रिया भारत सरकारच्या अनेक सूत्रांनी बुधवारीच व्यक्त केलेली होती.

भारतावर दबावाचा प्रयत्न

भारताने अमेरिकेच्या अटी मान्य कराव्यात, अशी ट्रंप यांची इच्छा होती, अशी चर्चा आहे. अमेरिकेच्या कृषीउत्पादनांना भारतीय बाजारपेठ मोकळी करुन द्यावी असा अमेरिकेचा आग्रह होता. पण भारताने तो मानण्यास नकार दिला असल्याचे समजते. त्यामुळे भारत-अमेरिका संभाव्य व्यापार करार होऊ शकलेला नाही. परिणामी भारतावर दबाव टाकण्यासाठी ट्रंप अशा प्रकारची भाषा करीत आहेत, अशीही चर्चा राजकीय आणि आर्थिक वर्तुळात करण्यात येत आहे.

ब्रिक्स हा देखील मुद्दा

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या सहा देशांची ब्रिक्स नावाची संघटना आहे. ही संघटना अमेरिकेच्या विरोधात असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला आहे. भारत हा मित्रदेश असला, तरी तो ब्रिक्सचा सदस्य आहे. भारतावर व्यापारी कर लावताना या बाबीचाही विचार करण्यात आला आहे. ब्रिक्स ही संघटना अमेरिकेच्या डॉलरचे महत्व कमी करण्याच्या प्रयत्नात असून अमेरिका असे होऊ देणार नाही, असेही अध्यक्ष ट्रंप यांनी गुरुवारी प्रतिपादन केले.

रशियाशी संबंध

भारत रशियाकडून कच्चे इंधन तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. तसेच शस्त्रास्त्रेही विकत घेतो. रशिया याच आर्थिक बळावर युक्रेनवर हल्ले करत आहे. त्यामुळे भारत, चीन आदी देशांनी रशियाला आर्थिक बळ देऊ नये. अन्यथा त्यांच्यावर दंड लावला जाईल, असाही इशारा ट्रंप यांनी दिला होता.

दोन दिवसांमध्ये स्पष्टता येणार

भारतावर 25 टक्के करासह किती दंड लावला जाईल, हे येत्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल असेही ट्रंप यांनी स्पष्ट केले आहे. भारताने अमेरिकेच्या वस्तूंवरील करांमध्ये मोठी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. या संबंधीही चालू आठवड्याच्या शेवटपर्यंत स्पष्टता येणार आहे, असे प्रतिपादन ट्रंप यांनी केले. ट्रंप यांच्या करघोषणेमुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात शेअरबाजार काहीसा घसरला होता. तथापि, दुपारच्या सत्रात त्यात पुन्हा तेजी आली. शेअरबाजार दिवसअखेर तेजीत बंद झाला. यावरुन गुंतवणूकदारांनी ट्रंप यांच्या कर घोषणेला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही, असे स्पष्ट होत आहे, असेही काही तज्ञांचे मत आहे.

गांधींची टीका, भाजपचा पलटवार

भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे, हे सत्य ट्रंप यांनी ओळखले आहे. तेच त्यांनी स्पष्टही केले आहे. भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत जाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी या दोन व्यक्ती उत्तरदायी आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांची ही कुत्सित टिप्पणी भारताने अर्थक्षेत्रात केलेल्या स्पृहणीय कामगिरीचा अपमान आहे. तसेच भारताच्या महत्वाकांक्षांना कमी लेखण्याची ही कृती आहे, असा पलटवार भारतीय जनता पक्षाने केला आहे.

चर्चेची खिडकी उघडी

चर्चेच्या सर्व खिडक्या बंद झालेल्या नाहीत. भारताशी चर्चा अद्यापही होत आहे. ती फलद्रूप झाल्यास सध्याच्या व्यवस्थेत मोठे परिवर्तन होऊ शकते, असेही संकेत ट्रंप यांनी दिले आहेत. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांचे नेमके काय होणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

अमित मालवीय यांचे प्रत्युत्तर

भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक दराने वाढत आहे. तसेच, गेल्या 11 वर्षांच्या काळात आम्ही मोठी झेप घेतली आहे. भारताचे सर्व आर्थिक निकष जोरावर आहेत. अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे. लवकरच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. यामुळेच राहुल गांधी अस्वस्थ आहेत. त्यांना भारताची प्रगती पाहवत नाही. म्हणून ते अन्य लोकांनी केलेल्या विधानांमध्ये स्वत:साठी आधार शोधत आहेत, अशी टीका अमित मालवीय यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article