भारताच्या पोरी आशियात भारी!
बांगलादेशचा पराभव करत यू-19 टीम इंडियाने जिंकला
वृत्तसंस्था/ क्वालालंम्पूर (मलेशिया)
गोंगडी त्रिशाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा पराभव करत यू-19 महिला आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. क्वालालंपूरच्या बियामास ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावून 117 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ केवळ 76 धावांवर सर्व बाद झाला आणि भारताने हा सामना 41 धावांनी जिंकला. गोंगडी त्रिशाला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, महिलांसाठी प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाने या स्पर्धेत बाजी मारताना जेतेपद पटकावले.
प्रारंभी, बांगलादेशची कर्णधार सुमैया अख्तरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. 25 धावांतच भारतीय संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर जी.त्रिशा व कर्णधार निक्की प्रसादने तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी साकारत संघाचा डाव सावरला. प्रसादने 12 धावांचे योगदान दिले तर त्रिशाने शानदार अर्धशतक ठोकले. तिने उपयुक्त खेळी साकारताना 47 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 52 धावा केल्या. याशिवाय, मिथिला विनोदने 17 तर आयुषी शुक्लाने 10 धावा केल्या. त्रिशाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाला शतकी मजल मारता आली. तिला इतर फलंदाजांची मात्र साथ मिळाली नाही. भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावत 117 धावा केल्या. बांगलादेशकडून फरझाना इस्मीनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
बांगलादेशचा धुव्वा
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ सुरुवातीपासूनच हतबल दिसला. झुरिया फिरदौसने सर्वाधिक 22 धावा केल्या तर फहमिदा चोया हिने 18 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजाकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. बांगलादेश संघाचे 9 फलंदाज केवळ एक अंकी धावा करु शकले. भारतीय महिलांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ 18.3 षटकांत 76 धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून आयुषी शुक्लाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पुरुनिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी 2-2 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
युवा भारतीय महिला संघ 20 षटकांत 7 बाद 117 (जी. त्रिशा 52, निक्की प्रसाद 12, मिथिला विनोद 17, आयुषी शुक्ला 10, इस्मीन 4 बळी) बांगलादेश महिला संघ 18.3 षटकांत सर्वबाद 76 (फिरदोस 22, फहमिदा चोया 18, आयुषी शुक्ला 3 बळी, सोनम यादव व सिसोदिया प्रत्येकी दोन बळी).
कोल्हापूरच्या ईश्वरी अवसरेची कमाल
कोल्हापूरातील साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी ईश्वरी मोरेश्वर अवसरे हिने युवा आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी साकारली. अष्टपैलू खेळाडू असलेल्या ईश्वरीची संपूर्ण स्पर्धेत कामगिरी चमकदार राहिली.
महिलांच्या स्पर्धेचे प्रथमच आयोजन अन् टीम इंडिया चॅम्पियन
भारतासाठी ही स्पर्धा खूपच अप्रतिम होती. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. तर नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे अर्निर्णीत राहिला. यानंतर सुपर-4 मध्ये भारताने बांग्लादेश आणि श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. अंतिम लढतीतही टीम इंडियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन साकारले. विशेष म्हणजे, आयसीसीकडून महिलांच्या या युवा आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावण्याची किमया केली आहे.