भारताच्या ‘चॅम्पियन्स’ मोहिमेला आजपासून सुरुवात
वृत्तसंस्था/ दुबई
भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीमधील मोहीम आज गुरुवारपासून सुरू होत असून त्यांचा सामना बांगलादेशशी होणार आहे. अलीकडील खराब कामगिरीचे सावट अजून दूर झालेले नसल्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखविणे भारताला क्रमप्राप्त आहे. या संघाभोवती असलेल्या अस्तित्वाच्या प्रश्नांना तोंड देण्याच्या दृष्टीने आजचा सामना ही पहिली पायरी आहे
मोहीम सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासमोर अनेक प्रश्न उपस्थित झालेले असून दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी विभाग आवश्यक प्रभाव दाखवू शकेल का, विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या गौरवशाली दिवसांना परत आणू शकतील का तसेच शुभमन गिलसारखी तऊण नावे सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेच्या दबावाचा नीट सामना करू शकतील का, आदी प्रश्नांचा त्यात समावेश आहे.
कोहली, रोहित आणि अगदी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, ज्यांच्या कारकिर्दीला फक्त सहा महिने झाले आहे, या साऱ्यांचे स्थान धोक्यात आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पराभवांमुळे बसलेले धक्के अद्याप कमी झालेले नाहीत. असे असले, तरी काही चांगल्या बाबीही मागील काही दिवसांत घडलेल्या आहेत. कर्णधार रोहितने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविऊद्ध शतक आणि कोहलीने अर्धशतक झळकावले, तर गंभीरच्या मार्गदर्शनाखालील संघाने टी-20 आणि एकदिवसीय मालिकांत अनुक्रमे 4-1 आणि 3-0 असा विजय मिळवला. दुसरीकडे, गिल हा एकदिवसीय मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास आला.
परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला ज्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे ती घरच्या मैदानावरील मालिकेपेक्षा खूप वेगळी असतील.. गट ‘अ’मध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे अलीकडेच त्यांना सामना करावा लागलेल्या उदासीन इंग्लंडपेक्षा जास्त धोकादायक आहेत आणि एक पराभव देखील संपूर्ण साखळी फेरीतील समीकरणे नाट्यामयरीत्या बदलू शकतो.

भारत अलीकडच्या काळातील 50 षटकांच्या क्रिकेटमधील एक मजबूत संघ राहिलेला असला, तरी बांगलादेशचा सामना करण्यापूर्वी त्यांना निवडीची काही कोडी सोडवावी लागतील. के. एल राहुलच्या फलंदाजीच्या स्थानापासून सुऊवात होते. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल की, अक्षर पटेल त्याच्यापेक्षा एक स्थान वर येऊन तो सहाव्या क्रमांकावर ढकलला जाईल हे पाहावे लागेल. या यष्टिरक्षक-फलंदाजाने इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि नंतर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तो पुन्हा पाचव्या क्रमांकावर आला होता. त्यामुळे संघ व्यवस्थापन परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दुसरी बाब म्हणजे गोलंदाजीत योग्य संतुलन साधणे हे मोठे आव्हान राहणार आहे. याचे एक कारण बुमराह दुखापतीमुळे अनुपस्थित आहे. त्यामुळे आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा नवीन चेंडूवरील जोडीदार ठरण्याच्या बाबतीत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यात शर्यत असेल. शमीला येथे त्याची गोलंदाजी आणखी प्रभावी बनवावी लागेल. राणा आतापर्यंत प्रभावी राहिला असून त्याच्याकडे अगदी पाटा खेळपट्ट्यांवरही वेग व चेंडूची उसळी यांच्या माध्यमातून फलंदाजांना धक्का देण्याची क्षमता आहे. पण सध्या डावखुरा असल्याने आणि गोलंदाजीत असलेल्या विविधतेमुळे अर्शदीपला नवा चेंडू मिळण्याची शक्यता जास्त आहे.

त्याशिवाय हार्दिक पंड्याला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून घेऊन भारत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. पण येथेही भारताची प्राथमिक निवड रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल ही राहणार असून त्यानंतर तिसरा फिरकीपटू म्हणून डावखुरा कुलदीप यादव आणि वऊण चक्रवर्ती यांच्यापैकी कोणाची निवड करायची याचा विचार करावा लागेल. अलीकडील फॉर्म पाहता चक्रवर्तीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. परंतु कुलदीपने मंगळवारी येथे सरावावेळी काही प्रतिष्ठित फलंदाजांना चकवून आपली तयारी दाखवली आहे. दुसरीकडे, बांगलादेश त्यांच्या स्वत:च्या संकटांना तोंड देत आहे. शाकिब अल हसनसारख्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे तो कमकुवत झाला आहे. तथापि जागतिक स्पर्धांमध्ये बांगलादेश हा नेहमीच धक्का देणारा संघ राहिलेला असून त्यामुळे भारत गाफील राहणे पसंत करणार नाही.
संघ : भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वऊण चक्रवर्ती.
बांगलादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, एम. डी. महमूद उल्ला, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ होसाई इमोन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वा.