महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मालिका बरोबरीत सोडविण्याचे भारतापुढे आव्हान

06:59 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा ‘टी-20’ सामना, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करून दाखविण्याची गरज

Advertisement

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

Advertisement

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा ‘टी-20’ सामना आज गुरुवारी येथे खेळविण्यात येणार असून यावेळी मालिका बरोबरीत सोडविण्याचे आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी एक आदर्श संघरचना शोधण्याचे आव्हान संघासमोर राहील. यावेळी बरोबरी साधण्याच्या दृष्टीने सारे लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर राहील.

नव्या फळीतील भारतीय गोलंदाजांना गेल्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत जो संघर्ष करावा लागला त्याचेच प्रतिबिंब दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या दुसऱ्या ‘टी-20’ लढतीत दिसून आले. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि त्याचा सहकारी मुकेश कुमार यांच्याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने भरपूर फटकेबाजी केली. अर्शदीप आणि मुकेश कुमार यांनी अनुक्रमे प्रति षटक 15.50 आणि 11.33 या सरासरीने धावा दिल्या. त्यांना एका दिवसात त्यातून सावरून आपल्या गोलंदाजी गाडी रुळावर आणावी लागेल. अर्थात, पोर्ट एलिझाबेथमध्ये पाऊस आणि दव यामुळे या गोलंदाजांना गोलंदाजी करणे थोडे कठीण झाले होते. परंतु प्रतिकूल वातावरणात गोलंदाजी करताना या जोडीकडे कल्पकता तसेच नियंत्रण यांचा अभाव जाणवला.

वैयक्तिक कारणांमुळे वेगवान गोलंदाज दीपक चहर उपलब्ध होऊ न शकल्याने भारतीय माऱ्यासमोरील अडचणीत भर पडली आहे. जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ गोलंदाजाच्या अनुपस्थितीत अर्शदीप आणि मुकेश यांनी भारतीय माऱ्याचा भार सक्षमपणे पेलावा, अशी व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. परंतु हे गोलंदाज त्या विश्वासाला आतापर्यंत सार्थ ठरवू शकलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाविऊद्ध नुकत्याच मायदेशी झालेल्या ‘टी-20’ मालिकेत 4-1 अशा फरकाने भारताने मिळविलेल्या विजयाने गोलंदाजीतील काही त्रुटी झाकोळून टाकल्या. सदर मालिकेत अर्शदीप सिंगने बेंगळूर येथे झालेल्या पाचव्या ‘टी-20’मध्ये एक शानदार शेवटचे षटक टाकले होते हे खरे. परंतु तो अपवाद वगळता या वेगवान गोलंदाजाला मालिकेत सूर मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. सदर मालिकेच्या चार सामन्यांमध्ये त्याने प्रति षटक 10.68 या सरासरीने धावा दिल्या. मुकेश कुमार देखील त्या मालिकेत धावांचा ओघ रोखू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्याने चार सामन्यांत चार बळी घेतले, पण त्याचबरोबर षटकामागे 9.12 या सरासरीने धावा दिल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ‘टी-20’ लढतीत देखील असेच चित्र दिसून आले आणि दौऱ्याच्या सुऊवातीच्या टप्प्यातच मालिका गमावू लागू नये म्हणून गोलंदाजांना आज प्रभावी कामगिरी करावी लागेल. ‘टी-20’ विश्वचषकापूर्वी फक्त चार ‘टी-20’ सामने शिल्लक असून निवड समितीने इतरत्र नजर फिरवण्याआधी अशी कामगिरी करून दाखविणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. रवींद्र जडेजा, जो एक वर्ष व चार महिन्यांनंतर ‘टी-20’मध्ये खेळला, तो देखील सेंट जॉर्ज पार्कमध्ये प्रभावी दिसला नाही. हा भारतीय उपकर्णधार अधिक चांगली खेळी करून दाखविण्यास उत्सुक असेल.

दुसरीकडे, फलंदाजीचा विचार करता रिंकू सिंगने ‘टी-20’मधले आपले पहिले अर्धशतक झळकावताना छाप पाडणे चालूच ठेवले आहे. सूर्यकुमारनेही आणखी एक अर्धशतक नोंदविलेले आहे आणि भारतीय कर्णधारपद त्याच्यावर फारसा दबाव आणत नाही हे त्याने दाखवून दिलेले आहे. आपल्या फलंदाजीने आणि नेतृत्व कौशल्याने मालिका बरोबरीत आणणारा विजय नोंदविण्यास तो उत्सुक असेल. जोपर्यंत ऋतुराज गायकवाड त्याच्या आजारातून ठीक होत नाही तोवर भारताला सलामीवीर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्याकडून जलद सुऊवातीची अपेक्षा असेल. गिल आणि जैस्वाल दोघेही गेल्या सामन्यात खातेही उघडू शकले नाहीत.

तथापि, जोहान्सबर्ग हे एक असे ठिकाण आहे जेथे भारताने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे आणि ‘टी-20’चा विचार करता त्यांच्या खात्यावर 3-1 अशी कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेलाही गोलंदाजी विभागात काही प्रमाणात चिंता सतावतील. कारण वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी, मार्को जॅनसेन आणि दुखापतग्रस्त झालेला लुंगी एनगिडी हे आजच्या सामन्याला मुकणार आहेत. कारण जॅनसेन व कोएत्झी हे कसोटीच्या तयारीसाठी प्रथम श्रेणी सामन्यामध्ये खेळणार आहेत.

संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रीत्झके, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स.

सामन्याची वेळ : रात्री 8.30 वा., प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉटस्टार.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media
Next Article