भारतासमोर सामना वाचवण्याचे आव्हान
जिंकण्यासाठी 549 धावांचे भलेमोठे टार्गेट : चौथ्या दिवशी 2 बाद 27 धावा : आफ्रिकन संघ मालिकाविजयाच्या उंबरठ्यावर
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकन संघाने दिलेल्या 549 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात दोन्ही सलामीवीराच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी गमावत 27 धावा केल्या होत्या. साई सुदर्शन 2 तर कुलदीप यादव 4 धावांवर खेळत होते. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला सामना वाचवण्यासाठी 522 धावांची तर पाहुण्या आफ्रिकन संघाला विजयासाठी 8 विकेट्सची गरज आहे.
चौथ्या दिवशी आफ्रिकेने बिनबाद 26 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली आणि आफ्रिकेने आपला दुसरा डाव 260/5 धावांवर घोषित केला. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्सने सर्वात मोठी खेळी केली. स्टब्सने 180 चेंडूत 9 चौकार व एका षटकारासह 94 धावा केल्या. स्टब्स बाद होताच द. आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाने डाव घोषित केला. स्टब्सशिवाय जॉर्जीने 68 चेंडूत 4 चौकार व एका षटकारासह 49 धावांची खेळी केली. एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. तर वियान मुल्डरने 69 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 35 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, चौथ्या दिवसाच्या खेळात 500 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतल्यावरही ट्रिस्टन स्टब्सच्या शतकासाठी टेम्बा बावुमाने डाव घोषित करण्यासाठी वेळ घेतला. स्टब्स 94 धावांवर बाद होताच त्याने 5 बाद 260 धावांवर डाव घोषित केला आणि टीम इंडियाला 549 धावांचे भलेमोठे टार्गेट दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर सुंदरने 1 विकेट घेतली.
जैस्वाल, केएलची पुन्हा निराशा
आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 549 इतक्या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीरांनी निराशा केली. यशस्वी जैस्वालला मार्को जॅन्सनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर झेलबाद केले आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. जैस्वाल 13 धावा करत बाद झाला. हार्मरने केएल राहुलला क्लीन बोल्ड करत संघाला दुसरा मोठा धक्का दिला. भारतीय संघावर कुलदीप यादवला नाईट वॉचमनच्या रुपात चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ आली. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 27 धावा केल्या असून साई सुदर्शन 25 चेंडूचा सामना करून 2 धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला कुलदीप यादव 22 चेंडूचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने 4 धावा काढल्या होत्या. भारतीय संघ अजूनही 522 धावांनी पिछाडीवर असून पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी टीम इंडियाला कसरत करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ 8 विकेट्स घेऊन 25 वर्षांनी टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 
द.आफ्रिकेविरुद्ध जडेजाचा ऐतिहासिक कारनामा
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 28.3 षटकात 62 धावा देत 4 गडी बाद केले. यासह त्याने या सामन्यात भारताचा पराभव दृष्टिक्षेपात असताना एका विक्रमाची नोंद केली आहे. आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट घेणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 40 डावात 84 विकेट घेतल्या आहे. याशिवाय जवागल श्रीनाथने 25 डावात 64, हरभजन सिंगने 19 डावात 60, आर अश्विनने 26 डावात 57 विकेट घेतल्या आहेत. तर जडेजाने 19 डावात 52 विकेट घेतल्या आहेत.
सर्वात जलद 2500 धावा जमविणाऱ्या फलंदाजांत जैस्वाल चौथ्या क्रमांकावर
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावांचा टप्पा गाठताना यशस्वी जैस्वालने तेंडुलकर, गावसकर, अझहरुद्दिन यांना मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला. जैस्वालने केवळ 53 डावांत हा टप्पा गाठला तर अझहरने 55 व गावसकर, तेंडुलकर यांनी 56 डावांत टप्पा पूर्ण केला होता. धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर सर्वात जलद 2500 धावा करण्याचा भारतीय विक्रम नोंदला गेला आहे. विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर दुसऱ्या स्थानावर असून त्याने 48 डावांत हा टप्पा गाठला होता.
जलद 2500 धावा करणारे भारतीय फलंदाज
डाव फलंदाज
47 सेहवाग
48 गौतम गंभीर
50 राहुल द्रविड
53 यशस्वी जैस्वाल
55 अझहरुद्दिन
56 सुनील गावसकर
56 सचिन तेंडुलकर.
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका पहिला डाव 489, भारत प.डाव 201, द.आफ्रिका दुसरा डाव 78.3 षटकांत 5 बाद 260 डाव घोषित : रिकेल्टन 64 चेंडूत 35, मार्करम 84 चेंडूत 29, ट्रिस्टन स्टब्स 180 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह 94, बावुमा 3, डी झोर्झी 68 चेंडूत 49, मुल्डर 69 चेंडूत नाबाद 35, अवांतर 15. गोलंदाजी : जडेजा 4-62, वॉशिंग्टन सुंदर 1-67.
भारत दुसरा डाव 15.5 षटकांत 2 बाद 27 : जैस्वाल 19 चेंडूत 13, केएल राहुल 6, साई सुदर्शन खेळत 2, कुलदीप यादव खेळत आहे 4, अवांतर 2. मार्को जॅन्सेन 1-14, हार्मर 1-1.