मॅकॉव बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था / मॅकॉव
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या मॅकॉव खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तरुण मनिपल्ली यांच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुष एकेरीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या जस्टीन होअ याने 23 वर्षीय मनिपल्लीचा 19-21, 21-16, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यामध्ये मनिपल्लीने पहिला गेम 21-19 असा जिंकून आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर त्याला पुढील दोन गेम्समध्ये सातत्य राखता आले नाही. हा उपांत्य फेरीचा सामना 85 मिनिटे चालला होता. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात एकेरीच्या मानांकनात 17 व्या स्थानावरील लक्ष्य सेनला इंडोनेशियाच्या अल्वी फराहान कडून सरळ गेम्समध्ये हार पत्करावी लागली. फराहानने हा सामना 21-16, 21-9 असा केवळ 39 मिनिटांत जिंकत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताचे आव्हान एकूण संपुष्टात आले आहे.