For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे 2036 ऑलिंपिकसाठी आवेदन

06:48 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचे 2036 ऑलिंपिकसाठी आवेदन
Advertisement

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेकडे रितसर इच्छादर्शक पत्र : पॅरालिंपिक भरविण्याचीही इच्छा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताने 2036 मध्ये ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धा भरविण्यासाठी आपण सक्षम आहोत, असे इच्छादर्शक पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेला अधिकृतरित्या पाठविले आहे. आणखी 12 वर्षांनी भारत हा जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठेची क्रीडास्पर्धा भरविण्यासाठी उत्सुक आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी केले होते. त्यानुसार भारताने हे इच्छादर्शक पत्र पाठविले आहे. मात्र, भारताला या ऑलिंपिकसाठी सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्थान या देशांशी तगडी स्पर्धा करावी लागणार आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बॅच यांनी भारताच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला पाठबळ दिले आहे. भारताने 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. तो भारतात भरविण्यात आलेला आतापर्यंतचा अखेरचा क्रीडा सोहळा होता. भारताला 2036 ची ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा भरविण्याची संधी प्राप्त झाली तर गुजरातमधील अहमदाबाद हे मुख्य यजमान महानगर असल्याची शक्यता अधिक आहे. भारतातील अन्य महानगरेही या स्पर्धेत आहेत. भारताला ही संधी मिळणार की नाही, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

बऱ्याच काळापासून प्रयत्न

2036 चे आलिंपिक यजमानपद भारताला मिळावे, यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न होत आहेत. प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात संबंधितांशी संपर्क केला जात आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि भारताच्या क्रीडाविश्वाचे इतर अनेक व्यवस्थापक नुकत्याच फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी तेथे गेले होते. त्यांनी भारतासाठी तेथे मोठ्या प्रमाणावर ‘लॉबींग’ केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थातच, जगातील इतर अनेक देश ही स्पर्धा आयोजित करण्याच्या स्पर्धेत असल्याने भारताला बरेच प्रयत्न करावे लागणार, असे मत अनेक क्रीडातज्ञांनी व्यक्त केले आहे.

ऑलिंपिक अभियान कक्ष

2036 च्या ऑलिंपिक आयोजनासाठी भारत जोरदार प्रयत्न करीत असून त्याकरिता भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ‘ऑलिंपिक अभियान कक्षा’ची स्थापना केली आहे. या कक्षाच्या सदस्यांनी प्राधिकरणाला सविस्तर अहवाल सादर केला आहे. ऑलिंपिक आयोजनासाठीचे भारताचे प्रयत्न यशस्वी करण्याच्या दृष्टीने अनेक मार्ग या अहवालात सुचविण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

सहा खेळांच्या समावेशासाठी उत्सुक

भारताला ऑलिंपिक आयोजनाची संधी मिळाल्यास भारत सहा खेळांच्या समावेशासाठी उत्सुक असल्याचे अभियान कक्षाने अहवालात स्पष्ट केले. योग, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, स्क्वॅश आणि टी-20 क्रिकेट या क्रीडा प्रकारांचा समावेश 2036 च्या ऑलिंपिक स्पर्धेत करण्यात यावा, असा भारताचा प्रस्ताव राहील. मात्र, भारतीय ऑलिंपिक संघटनेत काही वाद आहेत. संघटनेच्या विद्यमान अध्यक्षा पी. टी. उषा आणि संघटनेचे कार्यकारी मंडळ यांच्यात मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याच्या संदर्भात मतभेद आहेत. 2036 च्या ऑलिंपिकसाठी संधी मिळवायची असेल, तर भारताला हे वाद लवकरात लवकर संपवावे लागणार असून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेसमोर एकसंधत्व सादर करावे लागेल. कारण भारताचे आवेदन मान्य होण्यासाठी सूक्ष्म बाबींचीही पूर्तता परिपूर्ण पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे. ऑलिंपिकचे आयोजकत्व मिळवणे हे सोपे कार्य नसून भारताने आपल्या प्रयत्नांचे अत्यंत दक्षतापूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. तसेच, स्पर्धक देशांच्या तुलनेत आपली क्षमता अधिक असल्याचे सिद्ध करणेही निकडीचे आहे, असे मत मान्यवर क्रीडा तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.