For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे सर्वोत्तम खेळाडू क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित

06:58 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचे सर्वोत्तम खेळाडू क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित
Advertisement

राष्ट्रपती   मुर्मू यांच्या हस्ते वितरण, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रन्कीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रान्कीरेड्डी यांच्यासह क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा समावेश राहून त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान स्वीकारला.

Advertisement

चिराग आणि सात्विक यांना 2023 मधील देदिप्यमान कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. गतवर्षात त्यांनी त्यांचे आशियाई खेळांतील पहिले सुवर्ण जिंकले. आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक प्राप्त होण्याची ही पहिलीच खेप होती. तसेच आशियाई स्पर्धेचे विजेतेपद आणि इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेचे जेतेपद देखील त्यांनी जिंकले.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणारा हा पुरस्कार वितरण सोहळा गेल्या वर्षी 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत हांगझाऊ येथे आशियाई खेळ असल्याने पुढे ढकलण्यात आला होता. 26 खेळाडू आणि पॅरा-अॅथलीट्सना यावेळी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचलेले चिराग आणि सात्विक हे आता पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे ध्येय बाळगून आहेत, या वर्षी होणार असलेल्या ऑलिम्पिकसाठी ते जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहून पात्र झालेले आहेत. होय आमचे ते पुढचे ध्येय आहे. आम्ही पुन्हा एकदा देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्याची आशा बाळगतो, असे चिरागने सांगितले. .

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट बुद्बिबळातील नवीन ग्रँडमास्टर आर. वैशालीला देखील सन्मान स्वीकारताना लाभला. कोनेरू हंपी व द्रोणवल्ली हरिका यांच्यानंतर ग्रँडमास्टर बनणारी देशातील तिसरी महिला ठरण्याचा मान बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदच्या या थोरल्या बहिणीला मिळाला आहे. ज्यांची अनपुस्थिती ठळकपणे जाणवली त्यात नेमबाजीत (पिस्तूल) सनसनाटी, कामगिरी केलेल्या 19 वर्षीय ईशा सिंगचाही समावेश राहिला. ती जकार्ता येथील आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी झालेली आहे. सोमवारी तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदके जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात यश मिळविले आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या क्रीडा क्षेत्रातील इतर नामवंत खेळाडूंमध्ये माजी कनिष्ठ विश्वविजेता आणि गेल्या वर्षीच्या वरिष्ठ स्पर्धेतील कांस्यदकविजेता कुस्तीपटू अंतिम पांघल, बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन (गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकविजेता) आणि पॅरा-आर्चर शीतल देवी यांचा समावेश राहिला. हांगझाऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडास्पर्धेत शीतल देवीने दोन सुवर्णपदके जिंकली. यावर्षीच्या उल्लेखनीय द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांमध्ये बुद्धिबळ प्रशिक्षक आर. बी. रमेश यांचा समावेश राहिलेला आहे. प्रज्ञानंदला त्यांनीच तयार केलेले आहे. खेलरत्न पुरस्कारात 25 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकाचा, तर अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांमध्ये 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकाचा समावेश असतो.

पुरस्कारविजेते पुढीलप्रमाणे-2023 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार : चिराग शेट्टी व सात्विक साईराज रान्कीरेड्डी (बॅडमिंटन). अर्जुन पुरस्कार : ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), मुरली श्रीशंकर (अॅथलेटिक्स), पाऊल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अगरवाला (घोडेस्वारी), दिव्यकृती सिंग (घोडेस्वारी ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), सुशिला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरिन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वरी प्रताप सिंह तोमर (नेमबाजी), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदरपाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), अंतिम पांघल (कुस्ती), नाओरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजयकुमार रेड्डी (अंधांचे क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी): ललित कुमार (कुस्ती), आर. बी. रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश प्रभाकर देवऊखकर (मल्लखांब). (जीवनसिद्धी श्रेणी): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई. (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : मंजुषा कंवर (बॅडमिंटन), विनीतकुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी).

Advertisement
Tags :

.