पाकिस्तानच्या कारवाईला भारताचे ‘करारा जवाब’
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताची प्रशंसा वाढली
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेला सशस्त्र संघर्ष हे अघोषित युद्धच आहे, असे मत अनेक निवृत्त सेनाधिकारी आणि युद्ध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. दोन्ही देशांनी युद्धाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तशी घोषणा करण्यामध्ये आंतरराष्ट्रीय नियम आणि परंपरा यांचा अडथळा आहे. त्यामुळे तसे करण्यात आलेले नाही. तथापि, ज्या प्रकारे वार-प्रतिवार केले जात आहेत, ते युद्धाचेच वातावरण दर्शवितात अशी भावना आहे.
संघर्षाला प्रारंभ होऊन चार दिवस झाले आहेत. तथापि, ‘एक्सकलेशन’ किंवा युद्धभावना कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानने मानवी वस्त्यांच्या लक्ष्य बनविण्याची कृती केलेली आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याने आतापर्यंत भारतात अत्यल्प जीवितहानी झालेली आहे. मात्र, पाकिस्तानने स्वत:च्या वृत्तीत सुधारणा न केल्यास आणि नागरी वस्त्यांवरचे हल्ले न थांबविल्यास भारताला तशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची वेळ येणार आहे. इतकेच नव्हे, तर भारताला तसा अधिकारही आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार प्राप्त होतो, असे तज्ञांचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय नियम काय सांगतात...
आंतरराष्ट्रीय कायदे किंवा नियम हे देशांतर्गत कायद्यांप्रमाणे विधीसंमत नसतात. तर ते आजवरच्या प्रथा आणि परंपरांना अनुसरुन असतात. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने काही आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन्स किंवा मार्गदर्शक तत्वे निर्माण करण्यात आली आहेत. त्यांच्यानुसार एखादा देश आपल्या सैनिकांना आपल्या सर्वसामान्य नागरिकांची ढाल पुरवत असेल, तर अनुषंगिक धोका पत्करून हल्ला करण्याचा अधिकार प्रतिस्पर्धी देशाला प्राप्त होत असतो. याचा अर्थ असा की, सैनिकांची ढाल बनलेले नागरीकही सैनिक म्हणून गणले जातात आणि त्यांच्याविरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार प्रतिस्पर्धी देशाला प्राप्त होतो. हमासच्या विरोधात याच अधिकाराचा उपयोग इस्रायलने केलेला आहे.
विमानांना नागरी विमानांची ढाल
पाकिस्तानने आपल्या विमानांच्या नागरी विमानांची ढाल पुरविण्याचा उद्योग केलेला आहे. अशा स्थितीत भारताला ही नागरी विमानेही उडविण्याचा अधिकार मिळतो. भारताचा संरक्षण विभाग आणि परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्या शुक्रवारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारताने याचा उल्लेख करून आपला अधिकार उपयोगात आणण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट संकेत पाकिस्तानला दिला आहे.
मोठा निर्णय आहे शक्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी यासंदर्भातच वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केली असावी, असे तज्ञांचे अनुमान आहे. ते खरे असेल आणि पाकिस्तानने आज शनिवारपासून आपल्या कुरापती थांबविल्या नाहीत, तर भारतीय वायुदल अधिक सामर्थ्यानिशी पाकिस्तानवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पाकिस्तानची प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्यस्थितीत पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर आल्याचे दिसून येत आहे.
‘हारोप’ने घडविला विनाश
लाहोरच्या वायुसुरक्षा व्यवस्थेला उद्ध्वस्त करताना भारताने इस्रायल आणि भारत यांनी संयुक्तरित्या निर्मिलेली ‘हारोप’ ही विनाशकारी ड्रोन्स उपयोगात आणली आहेत. ही लॉएटरिंग श्रेणीतील ड्रोन्स आहेत. त्यांना कामिकेज असेही म्हणतात. ही ड्रोन्स आत्मघाती प्रकारची असून त्यांच्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांचे मिश्रण असते. ही ड्रेन्स आकाशात तरंगत राहतात आणि लक्ष्य दृष्टिपथात येताच अतिवेगाने त्यांच्यावर आदळून लक्ष्याचा खात्मा करतात. इस्रायल आपल्या शत्रूंच्या विरोधात याच घातक शस्त्राचा उपयोग करतो, अशी माहिती आहे.
हारोपची वैशिष्ट्यो आकड्यांमध्ये...
पल्ला : 1,000 किलोमीटरपेक्षा अधिक
तरंगण्याची क्षमता : सहा तास
वजन : 135 किलोग्रॅम
स्फोटके : 23 किलोग्रॅम अत्युच्च स्फोटक्षमता
नियंत्रण प्रणाली : इलेक्ट्रो-ऑप्टिकल रडाररोधी सेन्सर
वेग : अधिकतर 185 किलोमीटर प्रतितास
डागण्याचे स्थान : भूमीवरून भूमीवर किंवा कॅनिस्टर व्यवस्था
सीमेवर दोन्ही बाजूंनी संघर्ष
भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. उरी, कुपवाडा, तंगधार या महत्त्वाच्या सीमावर्ती भागात दोन्ही बाजूने संघर्ष होताना दिसत आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानची क्षेपणास्त्रs पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला त्यात 26 पर्यटकांना ठार करण्यात आले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. मात्र यानंतर पाकिस्तानकडून होणारी आगळीक थांबलेली दिसत नाही. आता भारताने जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय पाठबळ
पूर्ण युद्ध किंवा आंशिक युद्ध झाल्यास, भारताने जागतिक पाठिंबा आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. हा हल्ला करण्यापूर्वी भारताने जगभरातील महत्त्वाच्या देशांना कोणत्या परिस्थितीत दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला केला याची प्राथमिक माहिती दिली होती.आतापर्यंत भारताने सुमारे 80 देशांशी संपर्क साधला असून बहुतेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. भविष्यात भारत जगाला पुराव्यांसह याबाबत सांगण्याचा प्रयत्न करेल. तसेच युद्धासाठी किंवा या संघर्षासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे ठोस पुरावे भारत जगासमोर मांडेल हे निश्चित.
दैनंदिन जीवनावरील परिणाम
सरकारची सर्वात मोठी चिंता ही आहे की युद्ध झाल्यास सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होऊ नये. युद्धाचा विशेषत: महागाई आणि सेवांवर परिणाम होतो. भारताच्या बाजूने सर्वात मोठा मुद्दा म्हणजे येथील अंतर्गत परिस्थिती पूर्णपणे सामान्य असली तरी पाकिस्तान आधीच अनेक समस्यांनी वेढलेला आहे. सद्यस्थितीत भारतात जीवनावश्यक वस्तूंची टंचाईही नाही किंवा महागाईचा भडकाही दिसून येत नाही. खाद्यपदार्थांचा मुबलक साठा उपलब्ध असून पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी यांचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे.
विकास आणि गुंतवणूक
कोणत्याही संघर्षग्रस्त क्षेत्रात विकासावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. याशिवाय, जागतिक कंपन्यांमधील गुंतवणूकदार देखील अशा क्षेत्रात जाणे टाळतात. मात्र, भारताने काही देशांशी यापूर्वीच काही महत्त्वाचे करार करून द्विपक्षीय संबंध बळकट केले आहेत. भारताने इंग्लंडसोबत मुक्त व्यापार करार अंतिम केला आहे. अमेरिकन कंपनी स्टारलिंकला देशात प्रवेश देण्याबरोबरच अमेरिकेसोबतच्या टॅरिफ समस्येचे लवकरच निराकरण करण्यामागेही भारताची योग्य रणनीती दिसून येते.