भारताचा ‘शुभ’ आरंभ!
58 वर्षात प्रथमच बर्मिंगहॅममध्ये विजय : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 336 धावांनी मात : आकाशदीपचे सामन्यात 10 बळी
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (6 जुलै) इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने रविवारी बर्मिंगहॅममधील एजबस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 336 धावांनी दणदणीत विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. विशेष म्हणजे, भारताने 58 वर्षांत प्रथमच एजबस्टनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी कधीही भारतीय संघाला एजबॅस्टनमध्ये कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. तसेच भारताच्या विजयात कर्णधार शुभमन गिलसह वेगवान गोलंदाज आकाश दीपचेही (दोन्ही डावात 10 बळी) मोलाचे योगदान राहिले. भारताचा नवखा कर्णधार म्हणून शुभमन गिलचा हा पहिलाच कसोटी विजय आहे.
प्रारंभी, भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींमध्ये अफलातून कामगिरी करत एजबस्टनवर इतिहास रचला. भारतीय संघाने पहिल्या डावात 587 धावा केल्या तर, इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर सिराज आणि आकाश दीपच्या गोलंदाजीमुळे रोखण्यात यश आले. यानंतर टीम इंडियाने आपला दुसरा डाव 6 बाद 427 धावांवर घोषित केला अन् इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे आव्हान ठेवले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर आटोपला. आकाश दीपने 6 विकेट घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याला मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरने साथ दिली. भारतानं या विजयासह मालिकेत बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसरी कसोटी दि. 10 जुलैपासून लंडनमध्ये खेळवली जाईल.
यजमानांचा बर्मिंगहॅमध्ये दारुण पराभव
दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडसमोर 608 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवस अखेर 16 षटकात 3 बाद 72 धावा केल्या होत्या. ऑली पोप 24 धावांवर आणि हॅरी ब्रुक 15 धावांवर खेळत होते. पाचव्या दिवशी यजमान संघाने याच धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पावसामुळे पाचव्या दिवसाच्या खेळाला जवळपास पावणेदोन तास उशीराने सुरुवात झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच 20 व्या षटकात पोपला 24 धावांवर आकाश दीपने त्रिफळाचीत केले. त्यापाठोपाठ हॅरी ब्रुकलाही आकाश दीपने 23 धावांवर 22 व्या षटकात पायचीत केले. त्यामुळे इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण नंतर बेन स्टोक्स आणि जॅमी स्मिथ यांनी डाव सावरला आणि 70 धावांची भागीदारी केली. पण लंचब्रेकच्या शेवटच्या षटकात स्टोक्सचा (33) अडथळा वॉशिंग्टन सुंदरने दूर केला. त्यानंतरही ख्रिस वोक्सने बचावात्मक खेळत स्मिथची साथ दिली होती.
युवा फलंदाज जेमी स्मिथ दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना चांगलाच नडला. दुसऱ्या डावातही त्याने शानदार खेळी साकारताना 99 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारासह 88 धावांची खेळी साकारली. आकाशदीपने त्याला बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. यानंतर ख्रिस वोक्स (7), कार्से (38) आणि जोश टंग (2) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय गोलंदाजांनी त्यांना मैदानात फार काळ टिकू दिले नाही. यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 68.1 षटकांत 271 धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 587
भारत दुसरा डाव 6 बाद 427 घोषित
इंग्लंड पहिला डाव 407
इंग्लंड दुसरा डाव 68.1 षटकांत सर्वबाद 271 (बेन डकेट 25, ओली पोप 24, हॅरी ब्रूक 23, बेन स्टोक्स 33, जेमी स्मिथ 88, कार्से 38, जोश टंग 2, शोएब बशीर नाबाद 12, आकाशदीप 99 धावांत 6 बळी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी).
एजबस्टनमध्ये विजयी पताका
बर्मिंगहॅम येथील एजबस्टनच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाने 336 धावांनी इंग्लंडला पराभूत करत परदेशातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. तसेच एजबस्टनच्या मैदानात कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. या मैदानात भारतीय संघाने 1967 ते 2022 या कालावधीत 8 कसोटी सामने खेळले होते. यात 1986 मध्ये एक सामना अनिर्णित राहाल होता. याशिवाय 7 सामन्यात भारतीय संघाच्या पदरी पराभव पदरी पडल्याचे पाहायला मिळाले. अखेर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबस्टनच्या मैदानात विजयी पताका फडकावली आहे.
आकाश दीप-सिराजची अफलातून कामगिरी
लीड्स कसोटीत, जसप्रीत बुमराह भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत होता, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ मिळाली नाही. जवळजवळ सर्व गोलंदाजांनी खूप लवकर धावा दिल्या, ज्यामुळे इंग्लंडवर कोणताही दबाव आला नाही. बुमराह बर्मिंगहॅम कसोटीत खेळला नाही, परंतु मोहम्मद सिराज आणि आकाशदीपने त्याची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 6 विकेट तर आकाशदीपने 4 विकेट घेतल्या. तर, दुसऱ्या डावात आकाश दीपने 6 विकेट घेतल्या. सिराज व आकाशदीपने या दोघांनी दोन्ही डावात मिळवून 17 बळी घेत इंग्लंडला जोरदार धक्के दिले. आकाशने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत 10 विकेट्स एका कसोटीत घेतल्या. यानंतर चेतन शर्मा यांच्यानंतर इंग्लंडमध्ये 10 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.
शुभमन गिलचा धावांचा पाऊस
या मालिकेत कसोटीत कर्णधारपदाची सुरुवात करणारा शुभमन गिलने द्विशतक साजरे केले. त्याने 269 धावा केल्या आणि संघाला 587 धावांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या डावात गिलने पुन्हा एकदा जबाबदार खेळी करत 161 धावा केल्या आणि धावसंख्या 400 च्या पुढे नेली. गिलने दोन्ही डावात एकत्रितपणे 430 धावा केल्या, ज्यामुळे इंग्लंडला चौथ्या डावात 608 धावांचे लक्ष्य मिळाले.