For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनच्या ‘जशा’स भारताचे ‘तसे’

06:16 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
चीनच्या ‘जशा’स भारताचे ‘तसे’
Advertisement

आज जगात युद्धे केवळ पारंपरिक शस्त्रांनीच खेळली जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तसेच शत्रूचा प्रदेश जिंकण्यापेक्षा त्याला आर्थिकदृष्ट्या विकलांग बनविणे, हे सांप्रतच्या काळातले युद्धतंत्र असल्यामुळे प्रत्येक देशाला या नव्या युद्धतंत्रासाठी स्वत:ला सज्ज ठेवावे लागते. भारत आणि चीन यांच्यात अशाच प्रकारचा एक शस्त्रविहीन समरप्रसंग घडत आहे. भारताला दुर्बल बनविण्यासाठी चीनने जलनितीचा आधार घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे भारतानेही चीनला त्याच्याच औषधाची चव दाखविण्यासाठी स्वत:ची जोरदार सज्जता चालविली आहे. या जलसंघर्षाची रणभूमी आहे, तिबेटमधून, हिमालयाच्या उत्तरेकडून वाहणारी ब्रम्हपुत्रा नदी. या अद्भूत संघर्षाची ही संक्षिप्त माहिती...

Advertisement

पार्श्वभूमी : भारताचे दुर्लक्ष, चीनचे नियंत्रण

ड भारतात ब्रिटिशांची राजवट होती, तेव्हा भारताच्या उत्तरेला असलेला तिबेटचा भव्य प्रदेश बऱ्याच प्रमाणात ब्रिटिशांच्या आधीन होता. तिबेट हे बौद्धधर्मियांचे सर्वात महत्वाचे धार्मिक केंद्र आहे. तिबेटच्या उत्तरेला असणाऱ्या चिनी ‘ड्रॅगन’पासून आपली वसाहत असणाऱ्या भारताचे संरक्षण व्हावे, यासाठी ब्रिटिशांनी तिबेटचा भाग ‘बफर झोन’ म्हणून मानला होता आणि तो भाग चीनने हिसकावू नये, म्हणून तेथे भारतीय सेना नियुक्त केली होती. ते ब्रिटिशांचे धोरण होते.

Advertisement

ड 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारतात आलेल्या ‘स्वदेशी’ सरकारने तिबेटमधील सेना काढून घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी चीनला मोकळे रान मिळाले आणि त्याने 1950 पासूनच तिबेट घशात घालण्याची पद्धतशीर योजना चालविली. तिबेटमधील बौद्ध प्रशासन सामरिकदृष्ट्या प्रबळ नव्हते. त्यामुळे चीनने आपले सैनिक घुसवून पाहता पाहता तीन ते चार वर्षांमध्ये 12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा हा प्रदेश आपल्या घशाखाली घालून नियंत्रणात आणला.

ड विश्वशांतीच्या सुखद स्वप्नांमध्ये रममाण झालेल्या भारताच्या त्यावेळच्या नेतृत्वाच्या लक्षात हा प्रकार येईपर्यंत बराच विलंब झाला होता आणि चीनच्या घशात तिबेट गेला, त्यासमवेतच या भागातील समृद्ध जलसंपदाही चीनच्या नियंत्रणात आली. ब्रम्हपुत्रा नदी हिमालयात उगम पावून तिबेटच्या उत्तरेकडून वाहत येऊन भारताच्या ईशान्येला असलेल्या अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि तिचा पुढचा भारतातील प्रवास आसाम राज्यातून नंतर बांगलादेश असा होतो.

ड ब्रम्हपुत्रा ही प्रचंड नदी आहे. तिचा उल्लेख अनेकदा नदी असा न होता ‘नद’ असा होतो, कारण तिचा जलौघ मोठा आहे. भारताच्या दुर्लक्षामुळे ही नदी ताब्यात आल्यानंतर चीनने या जलसंपदेचा उपयोग वीज निर्मितीकरिता करण्यासाठी तिबेटच्या भागात या नदीवर मोठी धरणे बांधण्याची योजना केली. मात्र, हे करण्यात केवळ वीजनिर्मिती हा हेतू नव्हता. तर ब्रम्हपुत्रा नदीचा भारताच्या विरोधात ‘जलास्त्र’ म्हणून उपयोग करण्याचेही ते कारस्थान होते.

ब्रम्हपुत्रेवर चीनची धरणे : भारताला धोका

ड 1970 पासूनच चीनने तिबेटमधील ब्रम्हपुत्रेवर मोठी धरणे बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत दोन मोठी धरणे बांधली गेली आहेत आणि तिसऱ्या सर्वात मोठ्या धरणाची योजना कार्यान्वित होत आहे. हे धरण पूर्ण होईल, तेव्हा तिबेटमधील ब्रम्हपुत्रेचे पुष्कळसे पाणी आडविण्यात चीन यशस्वी होईल. यामुळे भारतात येणारे याच नदीचे पाणी अडविले जाईल आणि भारताच्या वाट्याला अल्प पाणी येईल, अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जाते.

ड ईशान्य भारताची पाण्याची पुष्कळशी आवश्यकता ब्रम्हपुत्रा भागवते. तिबेटमध्ये ही नदी ‘यारलुंग सांगपो’ या नावानेही परिचित आहे. भारतात प्रवेश केल्यानंतर तिला ब्रम्हपुत्रा अशी संज्ञा प्राप्त होते. आसाम राज्यातील नैसर्गिक ‘इकोसिस्टिम या नदीवर अवलंबून आहे. काझीरंगा हे जगप्रसिद्ध राष्ट्रीय अभयारण्य या नदीच्या आसाममधील खोऱ्यात स्थित आहे. याचाच अर्थ असा की पाणीपुरवठा आणि नैसर्गिक समतोल या नदीच्या जलावर अवलंबून आहे.

ड या नदीच्या ‘अपस्ट्रीम’वर, अर्थात, वरच्या प्रवाहावर चीनचे नियंत्रण असल्याने भारतात किती पाणी केव्हा सोडायचे हे चीनच्या हाती आहे. याचाच अर्थ असा की, ईशान्य भारतात पाण्याची टंचाई निर्माण करायची की महापूर आणायचा हे चीन ठरवू शकतो. यामुळे ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवर एकप्रकारे चीनचे नियंत्रण राहते. भारतासाठी ही परिस्थिती धोकादायक आणि हानीकारक असल्याने चीनच्या या कारस्थानाला प्रत्युत्तर देण्याची योजना भारताला करावी लागत आहे.

भारताच्या वाट्याचे एक भाग्य

ड या सर्व घडामोडींमध्ये भारताच्या वाट्यालाही एक नैसर्गिक भाग्य आले आहे. ते असे, की ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे सर्व जल हे तिबेटमधून येत नाही. ईशान्य भारतात ही नदी प्रवेशल्यानंतर तिला अरुणाचल प्रदेश, आसाम आणि इतर राज्यांमधून वाहणाऱ्या छोट्या उपनद्या येऊन मिळतात आणि ब्रम्हपुत्रेचा प्रवाह प्रचंड मोठा होतो. या उपनद्यांना मान्सूनच्या पावसाचे पाणी मिळते. तिबेट भागात पाऊस फारसा पडत नाही. त्यामुळे तेथून भारतात येणारे ब्रम्हपुत्रेचे पाणी भारतात पावसामुळे संकलित होणाऱ्या पाण्यापेक्षा कितीतरी कमी आहे.

तरीही चीनच्या धरणांचा परिणाम होणार...

चीनने तिबेटमधील ब्रम्हपुत्रेचे सर्व पाणी अडविले, तरी भारतातील ब्रम्हपुत्रा कोरडी पडत नाही. कारण तिला पावसाचे पाणी मिळतच राहणार आहे. मात्र, चीनच्या धरणांमुळे भारतातील ब्रम्हपुत्रेचा जलौघ काही प्रमाणात कमी होऊ शकतो. विशेषत: उन्हाळा आणि मान्सून संपल्यानंतरच्या काळात पाणीटंचाई सध्यापेक्षाही अधिक प्रमाणात अनुभवास येऊ शकते. अशी सध्याची स्थिती आहे.

भारताची उपाययोजना काय आहे...

ड चीनच्या संभाव्य जयुद्धाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने विचारपूर्वक एक योजना सज्ज ठेवली आहे. ‘ठोशास प्रतिठोसा’ या न्यायाप्रमाणे चीनच्या धरणाला ‘प्रतिधरण’ ही भारताची योजना आहे. अनेक तज्ञांशी विचारविनिमय करुन आणि साधक-बाधक परिणामांचा विचार करुन या योजनेचे स्वरुप ठरविण्यात आले आहे.  भारतातील सर्वात मोठे धरण ब्रम्हपुत्रा नदी आणि तिच्या एका उपनदीवर बांधण्यात येणार आहे. हे धरण चीनच्या संभाव्य धोक्यापासून ईशान्य भारताचे ‘कवचकुंडला’प्रमाणे संरक्षण करणार आहे. म्हणून ही योजना महत्वाची आहे.

ड भारताचे हे प्रस्तावित धरण चीनच्या धरणाप्रमाणेच मोठे असेल. त्यामध्ये मोठा पाणीसाठा होणार आहे. चीनने वरुन येणारे पाणी बंद केल्यास, किंवा ते पाणी इतरत्र वळविल्यास किंवा कमी विसर्ग केल्यास भारत आपल्या धरणातील पाणीसाठ्याचा विसर्ग करुन पाणीटंचाई निर्माण होण्यापासून स्वत:चे संरक्षण करु शकतो. तसेच, चीनने मोठ्या प्रमाणात वरुन पाणी सोडून आसाम किंवा ईशान्य भारतात महापुराचे संकट आणण्याचा प्रयत्न केला, तर हे पाणी भारताच्या धरणात अडविले जाऊन अरुणाचल प्रदेश आणि आसामचे महापुराचे संकट दूर होईल.

सर्व काही नाही सोपे, सरळ...

ड चीनच्या धरणांना धरणानेच प्रत्युत्तर देण्याची भारताची ही योजना उत्कृष्ट आहे, हे निश्चित. तथापि, असे धरण बांधणे वाटते तितके सोपे नाही. त्याच्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

  1. पर्यावरणाचा विचार : धरण बांधण्यासाठी स्थान शोधताना पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहचेल अशाप्रकारे योजना करावी लागणार आहे. ईशान्य भारताची पर्यावरण व्यवस्था खूपच संवेदनशील आहे. त्यामुळे तो विचार व्हावा लागणार आहे.
  2. स्थानिक नागरिकांचा विरोध : भारताच्या प्रस्तावित धरणाचा आकार मोठा असल्याने धरण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आधीपासून सज्जता हवी.
  3. अडथळे करण्याचा प्रयत्न : या योजनेला भारतातील काही विकासविरोधी राजकीय पक्षांकडून किंवा तशा संघटनांकडून विरोध केला जाऊ शकतो. तो कसा हाताळायचा याची योजनाही केंद्र सरकारला आधीपासूनच सज्ज ठेवायची आहे.
  4. न्यायालयीन संघर्ष : या धरणाच्या विरोधात काही संघटना न्यायालयात जाऊ शकतात. स्थगिती मागू शकतात. अशी स्थगिती मिळाल्यास प्रकल्प रखडून खर्चाच्या दृष्टीने हाताबाहेर जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी उपाययोजना हवी.
  5. देशाबाहेरील शक्ती : भारताचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प तडीस जाऊ नये, म्हणून देशबाह्या शक्तीदेखील कार्यरत होऊ शकतात. भारतातील नागरिकांना या प्रकल्पाविरोधात उठविण्याची कामे ते करु शकतात. यावरही उपाय आवश्यक.

धरण कसे काम करणार...

ड भारताचे प्रस्तावित धरण एक ‘शॉक अॅबसॉर्बर’ प्रमाणे काम करणार आहे. चीनने त्याच्या धरणातून पूर्वसूचना न देता अधिक पाणी सोडल्यास ते या धारणात प्रथम येईल. नंतर भारत सोयीनुसार त्याचा विसर्ग करु शकणार आहे. त्यामुळे आसाम किंवा ईशान्य भारतात अचानक पूर येण्याचे प्रकार घडणार नाहीत.

ड चीनने पाणी अडवून धरल्यास, किंवा ते अन्यत्र वळविल्यास भारतातील ब्रम्हपुत्रेत अकस्मात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही. कारण भारताच्या धरणात साठलेले पाणी त्यावेळी भारताच्या उपयोगी पडणार आहे. अशाप्रकारे या दोन्ही स्थितींमध्ये भारताचे स्वत:चे धरण ईशान्य भारताचे संरक्षण करणार आहे.

ड भारताच्या धरणाला दोन प्रकारे पाणी मिळणार आहे. तिबेटमधील ब्रम्हपुत्रेतून येणारे पाणी तर मिळेलच. तसेच मान्सूनच्या पाण्याचीही साठवणूक या धरणात होऊ शकते. अशाप्रकारे आणीबाणीच्या काळात उपयोगी पडेल, असा पाणीसाठा या प्रस्तावित धरणात केला जाऊ शकतो, अशी भारताची आदर्श योजना आहे.

धरणाचे महत्वाचे उपयोग :

ड वीजनिर्मिती : भारताच्या धरणातूनही मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती शक्य आहे. वीजनिर्मितीचे प्रमाण धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून राहणार आहे.

ड शेती आणि इतर : या धरणातील पाण्याच्या साठ्याचा उपयोग उन्हाळ्यात शेतीसाठीही केला जाऊ शकेल. तसेच पिण्याच्या पाण्यासाठीही होणार आहे.

ड उद्योगांसाठी : काही प्रमाणात हे पाणी उद्योगधंद्यांसाठी आणि तत्सम कारणांसाठीही असू शकते. यामुळे उद्योगांची वाढ होण्यास अनुकूलता मिळेल.

धरणाचा आवाका (आकडेवारीत)

ड धरणासाठीचा खर्च : 6 लाख 40 हजार कोटी रुपये (यात वीज विपणनासाठीच्या पॉवर ग्रीड निर्मितीचाही खर्च अंतर्भूत केला गेला आहे.

ड धरणाचा आकार : ऑलिंपिक स्पर्धेचे 40 लाख जलतरण तलाव मावतील, एवढे पाणी या धरणात साठणार आहे. भारतातील सर्वात मोठे धरण..

ड जलविद्युत केंद्रे : या धरणावर 5 विद्युत केंद्रे असतील. एकंदर विद्युत निर्मिती चीनमधील सर्वात मोठ्या धरणाच्याही तिप्पट करण्याची योजना आहे.

आवश्यकता कशासाठी...

ड आम्ही कधीही भारतात पूर किंवा दुष्काळ अशी स्थिती येऊ देणार नाही, असे चीनने स्पष्ट केले असले, तरी त्या देशाचा भरवसा देता येत नाही. तसेच ऐनवेळी कोणतीही उपाययोजना केले जाऊ शकत नाही. म्हणून धरण आवश्यक.

ड भारताच्या जलसंरक्षकाची भूमिका हे धरण साकारणार आहे. पाण्याचा अतिरिक्त आरक्षित साठा म्हणूनही ते उपयोगी आहे. ईशान्य भारताचे मानवनिर्मित पुरापासून किंवा दुष्काळापासून संरक्षण हे महत्वाचे कार्य हे धरण करणार आहे.

देशाची सुरक्षा सर्वात महत्वाची...

ड या धरणाला अनेक कारणांसाठी विरोध होण्याची शक्यता आहे. तथापि, विरोधकांची समजूत घालून शक्य झाल्यास सामोपचाराने प्रश्न सोडवावा लागणार आहे. पण तो मार्ग शक्य नसल्यास कठोर उपाय करावे लागणार आहेत. कारण हा प्रश्न देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे. देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नासमोर इतर मुद्दे गौण मानणे आवश्यक आहे. त्यामुळे या धरणाला होणारे सर्व संभाव्य विरोध मोडून काढणे देशहितासाठी अत्यावश्यक आहे, हे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यायचे आहे.

  • -  अजित दाते
Advertisement
Tags :

.