भारताचे पाकिस्तानवर कारवाईस्त्र
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेतले अनेक महत्वपूर्ण निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करताना अनेक निर्णय जाहीर केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यासंबंधी माहिती देताना सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच या भ्याड हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पातळीवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सीसीएसची बैठक झाली. सीसीएस बैठकीच्या समाप्तीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने माध्यमांना संबोधित केले. याप्रसंगी पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. मिस्री यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच जगातील अनेक देशांनी या हल्ल्याविरोधात भारताला पाठिंबा दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यामागे पाकिस्तानी कनेक्शन असल्याने संबंधित दहशतवाद्यांबरोबरच त्यांना पाठीशी घालणाऱ्या देशावरही कारवाई करण्यात येत असल्याचे जाहीर केले. भारत सरकारच्यावतीने बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले असून पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी कपात करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. अटारी सीमा तपासणी नाका बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईलच, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संरक्षण विभाग आणि केंद्रीय गृह विभागाचे मंत्री आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही या बैठकीला उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती बैठकीत सादर केली.
या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण विभाग आणि गृहविभागाचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. अशाप्रकारे पर्यटकांवर हल्ला होण्याची ही काश्मीर खोऱ्यातील गेल्या चार दशकांमधील पहिलीच घटना आहे. काश्मीरची शांततेच्या मार्गावर होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे, हे स्पष्ट आहे. तथापि, या हल्ल्यात सहभागी झालेले दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानात लपलेल्या प्रमुख सूत्रधारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हल्ल्यात पाच दहशतवाद्यंाचा सहभाग
या हल्ल्यात तीन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवाद्यंाचा सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच या हल्ल्याशी संबंधित काही संशयितांना राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच या हल्ल्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे पाकिस्तानातही हालचाल वाढली आहे. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद हा भूमिगत झाल्याचे वृत्त आहे.
हल्ल्याचे व्हिडीओ चित्रण
हल्ला करत असताना दहशतवाद्यांनी अंगावर कॅमेरे बसविले होते. त्यामुळे त्यांनी या हल्ल्याचे पूर्ण चित्रिकरण केले आहे, अशी शक्यता आहे. हे चित्रिकरण ते सोशल मीडियावर प्रसारित करू शकतात. कशाप्रकारे आपण हिंदूंना मारले, याचे प्रदर्शन करून ते भारत आणि हिंदूंच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
सैफुल्ला हा प्रमुख सूत्रधार
सज्जाद गुल आणि सैफुल्ला कसुरी हे पाकिस्तानातील दहशतवादी या हल्ल्याचे सूत्रधार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सैफुल्ला हा ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ किंवा टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. काश्मीर भारतापासून हिसकावून घेऊन त्याचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला पाहिजे, अशी त्याची आणि त्याच्या संघटनेची विचारसरणी असून तो आपल्या प्रक्षोभक भाषणांसाठी कुख्यात आहे, अशी माहिती त्याच्यासंबंधी उपलब्ध आहे.