भारतीयांची होणार नाही अतिरिक्त तपासणी
कॅनडाच्या सरकारचे घोषणेनंतर घुमजाव : विमानतळांवरील तपासणीचा मुद्दा
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाने भारतात जाणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त तपासणीचा निर्णय मागे घेतला आहे. कॅनडाच्या वाहतूक मंत्री अनिता अनादं यांच्या कार्यालयाने संबंधित निर्बंध हटविण्यात आल्याची माहिती दिली आहे. नवे नियम मागील आठवड्यातच लागू करण्यात आले होते. भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त खबरदारी बाळगली जात असल्याचे कॅनडा सरकारने म्हटले होते. तर एअर कॅनडाने भारतात जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक नोटीस जारी केली होती. भारतात जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सुरक्षा संबंधी कठोर आदेशांमुळे आगामी फ्लाइटसाठी प्रतीक्षा कालावधी अपेक्षेपेक्षा अधिक राहू शकतो असे एअर कॅनडाने म्हटले होते.
भारतात जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षा संबंधी तपासणी पाहता आदेश जारी करण्यात आला असल्याचे एअर कॅनडाच्या प्रवक्त्याने ईमेलद्वारे सांगितले होते. विमानतळावर भारतात जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याने कॅनडा सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली होती. भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला होता.
यापूर्वी चालू महिन्यातच शिख फॉर जस्टिस प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने शिखांना इशारा देत एक व्हिडिओ जारी केला होता. 19 नोव्हेंबरनंतर एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका. जीवाला धोका असू शकतो असे पन्नूने म्हटले होते. तसेच स्पष्टीकरणादाखल त्याने एअरलाइनवर बहिष्काराचे आवाहन करत असल्याचा दावा केला होता. परंतु त्यावेळी भारताच्या दूतावासाने कॅनडा सरकारसमोर औपचारिक स्वरुपात हा मुद्दा उपस्थित केला होता. तर कॅनडा सरकारने एअर इंडियाच्या उ•ाणांसाठी सुरक्षा वाढविली होती.