खलिस्तानींविरोधात भारतीय एकवटले
लंडनमधील दूतावासाबाहेर भारतीय एकत्र
वृत्तसंस्था / लंडन
लंडन येथील भारतीय दूतावासावर रविवारी खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेकडो भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासाबाहेर एकत्र येत भारतासोबत एकजूटतेचा संदेश दिला आहे. यादरम्यान ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देण्यात आल्या. खलिस्तानी समर्थकांच्या विरोधात निदर्शने करणाऱया भारतीयांनी ‘जय हो’ या गाण्यावर ताल धरला होता.
काही लोक भारत आणि लंडनमधील शांततेचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे भारतीयांनी म्हटले आहे. भारतीय दूतावासात तोडफोड करत तिरंगा उतरविण्याच्या घटनेवेळी पोलीस तेथे नव्हते. तर मंगळवारी मात्र स्थानिक पोलिसांची टीम अलर्टवर होती. रविवारीच अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता. तर कॅनडातील भारतीय राजदूताचा कार्यक्रम उधळण्याचा कट खलिस्तान समर्थकांनी रचला होता. यामुळे राजदूताने या कार्यक्रमात सहभागी होणे टाळले होते.
नवी दिल्लीतील ब्रिटिश दूतावासाबाहेर शीखधर्मीयांनी सोमवारी खलिस्तान समर्थकांच्या विरोधात बॅनर झळकवत घोषणा दिल्या होत्या. भारत आमचा स्वाभिमान आहे. तिरंग्याचा अपमान आम्ही कुठल्याही स्थितीत सहन करणार नसल्याचे शीखधर्मीयांनी सोमवारी म्हटले होते.
खलिस्तानी अवतार सिंह खांडाला अटक
19 मार्च रोजी खलिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. या पूर्ण घटनेमागे अवतार सिंह खांडा याचा हात असल्याचे आता समोर आले आहे. लंडन पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समजते. खांडानेच दूतावासाच्या पहिल्या मजल्यावर फडकत असलेला तिरंगा काढून फेकला होता. खांडा हा खलिस्तानी लिबरेशन फोर्सशी संबंधित राहिलेले कुलवंत सिंह खुखराना यांचा पुत्र आहे.
अमृतपाल सिंहचा हँडलर
खांडा हाच अमृतपालचा हँडलर असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी खांडाचे कनेक्शन आहे. खांडा हा प्रतिबंधित संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख परमजीत सिंह पम्माचा निकटवर्तीय आहे. पम्मा हा शीख युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी क्लासेसचे आयोजन करत असतो. आयईडी तयार करण्यात खांडा तरबेज आहे.