वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांची चमक
तीन महिला अंतिम तर दोन पुरुष बाद फेरीत
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या 17 व्या वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिपमध्ये भारताने शानदार प्रदर्शन केले असून तीन महिलांनी अंतिम फेरी गाठली आहे तर दोन पुरुषांनी बाद फेरीत स्थान मिळविले आहे.
महिला विभागात अपर्णाने कौशल्यपूर्ण खेळ करीत इंडोनेशियाच्या थरिसा दीया फ्लोरेन्टिनाचा 52 किलो वजन गटाच्या लढतीत पराभव करून अंतिम फेरी निश्चित केली. अपर्णाची जेतेपदासाठी व्हिएतनामच्या एन्गो थि भुआँग एन्गा हिच्याशी होईल. 60 किलो वजन गटात करीना कौशिकने ताकद व अचूक नीतीचा वापर करीत ब्राझीलच्या नथालिया ब्रिकेसी सिल्वावर मात करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. तिची अंतिम लढत चीनच्या जिआओवी वु हिच्याशी होईल. महिलांच्या 75 किलो वजन गटात शिवानीने रशियाच्या एकतेरिना वालचुकला धक्का देत अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी तिची लढत इराणच्या मन्सूरियान सेमिरोमीशी होईल.
पुरुष विभागात 56 किलो वजन गटात सागर दाहियाने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याची उपांत्य लढत फिलिपिन्सच्या कार्लोस बेलॉन ज्युनियरशी होईल. 75 किलो वजन गटात विक्रांत बलियनची उपांत्यपूर्व लढत चीनच्या जेनशंग जिनविरुद्ध होईल.