अमेरिकन वंशाच्या भारतीयांचे ‘टाईम प्रभावशालीं’मध्ये वर्चस्व
अजय बंगा, भाविश अग्रवाल यांचा ठसा
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जगातील सर्वात प्रसिद्ध मासिक ‘टाईम’ने 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारतीय वंशाच्या नऊ व्यक्तींचा समावेश केला आहे. यामध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा ते ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांचा समावेश आहे. मासिकात प्रकाशित झालेल्या ‘टाईम 100 क्लायमेट लिस्ट’मध्ये जगभरातील सीईओ, संस्थापक, संगीतकार, धोरणकर्ते आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. ही यादी 30 नोव्हेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद-2023 पूर्वी जाहीर करण्यात आली आहे.
टाईम मासिकाने हवामान बदल रोखण्यासाठी काम करणाऱ्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत व्यावसायिक जगतापासून ते संगीत जगतातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय वंशाचे नऊ अमेरिकन समाविष्ट आहेत. यावषी जूनमध्ये जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले भारतीय वंशाचे अजय बंगा, हवामान बदलाशी लढा देत गरिबी निर्मूलनाच्या दिशेने संस्थेसाठी एक नवीन मिशन सुरू करत आहेत.
या यादीत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल, रॉकफेलर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव जे शाह, बोस्टन कॉमन अॅसेट मॅनेजमेंटच्या संस्थापक गीता अय्यर, यूएस एनर्जी लोन प्रोग्राम ऑफिस डायरेक्टर जिगह शाह, हस्क पॉवर सिस्टम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मनोज सिन्हा, कैसर पर्मनेन्ट येथील पर्यावरण व्यवस्थापनच्या कार्यकारी संचालक सीमा वाधवा आणि महिंद्रा लाइफस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमित कुमार सिन्हा यांचा समावेश आहे. आम्ही सर्व क्षेत्रांतील हवामान बदलासाठी काम करणाऱ्या लोकांना या यादीत स्थान दिले आहे. पण आम्हाला वाटते की या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिक लोकांचाही समावेश करता आला असता, असे ही यादी जाहीर करताना टाईम मासिकाने म्हटले आहे.
टाईम मॅगझिन 100 वर्षांहून अधिक जुने आहे. त्याची पहिली प्रत 3 मार्च 1923 रोजी प्रकाशित झाली. त्याची सुऊवात ब्रिटन हेडन आणि हेन्री लुस यांनी केली होती. टाईम हे जगातील सर्वात प्रतिष्ठित मासिक मानले जाते.