नव्या व्हिसा नियमामुळे ब्रिटनमध्ये भारतीयांना झटका
कुटुंबाला नेता येणार नाही सोबत
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लाखोंच्या संख्येत राहत असलेल्या स्थलांतरितांना मोठा झटका दिला आहे. ब्रिटनमध्ये आता व्हिसासंबंधी नवे नियम लागू झाले आहेत. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या बहुतांश विदेशी विद्यार्थ्यांना आता स्वत:च्या कुटुंबाला ब्रिटनमध्ये आणता येणार नाही. या निर्णयामुळे ब्रिटनमध्sय राहून शिकत असलेल्या हजारोंच्या संख्येतील भारतीय विद्यार्थ्यांवर प्रतिकूल प्रभाव पडणार आहे. विदेशी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कुटुंबाला ब्रिटनमध्ये आणणे चुकीची प्रथा असल्याचे सुनक सरकारने म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. याचमुळे या निर्णयाचा भारतीयांवर सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. या निर्बंधामुळे हजारोंच्या संख्येतील लोकांच्या स्थलांतरावर बंदी येणार आहे. आमच्या सरकारने स्थलांतरितांच्या संख्येत कपात करण्याची प्रतिबद्धता दर्शविली होती असे ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेवर्ली यांनी म्हटले आहे. 2024 मध्ये आम्ही ब्रिटनच्या लोकांसाठी काम करण्यास सुरुवात केली असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे. सुनक हे पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.