भारतीय युवा महिला संघ विजयी
वृत्तसंस्था / कौलालंपूर
येथे 19 वर्षांखालील वयोगटाची महिलांची विश्व चषक टी-20 स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी सोमवारी खेळविण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यात विद्यमान विजेत्या भारतीय महिला संघाने स्कॉटलंडचा 119 धावांनी पराभव केला.
या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 7 बाद 164 धावा जमविल्या. भारतीय संघातील जी. कमलिनीने 23 चेंडूत 32, जी. त्रिशाने 26, सानिका चाळकेने 17 आणि कर्णधार निकी प्रसादने 25 धावा केल्या. स्कॉटलंडतर्फे अॅमी बॅलेडीने 13 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर स्कॉटलंडचा डाव 18.5 षटकात 45 धावांत आटोपला. भारतातर्फे शबनम शकिल, वैष्णवी शर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
अन्य सरावाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान मलेशियाचा 140 धावांनी पराभव केला. तर विंडीजने नेपाळवर 9 धावांनी विजय मिळविला. अमेरिकेने न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला. बांगलादेशने लंकेवर 4 गड्यांनी मात केली. इंग्लंडने सामोआचा 9 गड्यांनी तर पाकने नायजेरियाचा 11 धावांनी पराभव केला.
या स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत असून भारताचा सलामीचा सामना विंडीजबरोबर येत्या रविवारी होणार आहे. 2023 साली द. आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे भारताने पटकाविताना अंतिम सामन्यात इंग्लंडचा 7 गड्यांनी पराभव केला होता.